देश विदेश

राष्ट्रपतींनी काढला राजभवनातून पळ…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 July :- श्रीलंकेतील आर्थिक संकटावर सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान आंदोलकांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानावर कब्जा केला. राजपक्षे देश सोडून जातील अशी शक्यता प्रसारमाध्यमांमध्ये वर्तवली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान विक्रमसिंघे यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर त्यांनी ही माहिती दिली. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी इमर्जन्सीची बैठक बोलावली होती, ज्यामध्ये असेंबली अध्यक्षांना हंगामी राष्ट्रपती बनवण्याचा प्रस्ताव होता.


श्रीलंकेत प्रदिर्घ काळापासून राष्ट्रपती गोटबायांविरोधात ‘Gota Go Gama’ व ‘Gota Go Home’ आंदोलन सुरू आहे.सिंहली भाषेत गामाचा अर्थ गाव होतो. आंदोलक रस्त्यात कोणत्याही ठिकाणी तंबू ठोकून गाड्यांचे हॉर्न वाजवत राष्ट्रपती व त्यांच्या सरकारविरोधात ‘गोटा-गो-गामा’ ची नारेबाजी करत आहेत. याचा मुख्य हेतू राष्ट्रपती गोटबाया यांना सत्ता सोडण्यासाठी मजबूर करण्याचा आहे.

देशातील वाढत्या अराजकाच्या पार्श्वभूमीवर बार कौन्सिल ऑफ श्रीलंकाने राष्ट्रपती गोटबाया यांची भेट घेतली आहे. आंदोलकांनी त्यांचे सचिवालय व निवासस्थानावर कब्जा केल्यामुळे ते कशा प्रकारे आपल्या कर्तव्याचे निर्वहन करतील, असा प्रश्न कौन्सिलने त्यांना केला आहे.

देशातील बिघडत्या स्थितीमुळे जपानचे राजदूत मिजुकोशी हिदेकी यांनी श्रीलंकेला वाढीव आर्थिक मदत करण्यास नकार दिला आहे. सद्यस्थितीत लंकेला अर्थसहाय्य केले तर त्यामुळे स्थिती अधिक बिघडण्याचा धोका आहे. त्यामुळे सध्या लंकेला कोणतीही मदत केली जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भविष्यात मदत करण्याचेही संकेत दिले.

निदर्शकांचा जत्था गॉल स्टेडिअमपर्यंत पोहोचला आहे. याठिकाणी ऑस्ट्रेलिया-श्रीलंकाचा क्रिकेट सामना सुरू आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याही आंदोलनात सहभागी झाला आहे. दुसरीकडे, राजधानी कोलंबोतील आंदोलनही चिघळले आहे. पोलिसांसोबतच्या चकमकीत 100 हून अधिक आंदोलक जखमी झालेत. हाताबाहेर जाणारी स्थिती पाहून पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. पोलिसांनीही निदर्शकांसोबत हातमिळवणी सुरू केली आहे.

श्रीलंकेत सर्वसामान्य नागरिकांची दररोज पोलिस, आर्मी व हवाई दलाच्या जवानांसोबत हिंसक झडप होत आहे. कारण, देशभरातील पेट्रोल पंपांवर लष्करातर्फे निगराणी केली जात आहे. देशभरातील नागरिकांत सरकारविरोधात कमालीचा रोष पसरला असून, सर्वत्र दंगल सदृश्य स्थिती उद्भवली आहे. शाळा, महाविद्यालये व रुग्णालयेही बंद आहेत. त्यामुळे तरुण वर्गावर आपल्या कुटुंबीयांची ससेहोलपट पाहण्याची वेळ आली आहे.