देश विदेश

जगावर मंकीपॉक्सचे संकट; काय आहे मंकीपॉक्स, कसा पसरतो?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 May :- कोरोना महामारीचा सामना करणाऱ्या जगावर आता मंकीपॉक्सचे संकट आले आहे. हा आजार अवघ्या 15 दिवसांत 15 देशांत पसरला आहे. शुक्रवारी बेल्जियम मंकीपॉक्सच्या रुग्णांसाठी 21 दिवसांचे सक्तीचे विलगीकरण करणारा जगातील पहिला देश ठरला. जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO) कोणत्याही देशात या आजाराचा एक रुग्ण आढळला तरी तो या आजाराचा उद्रेक मानला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, मंकीपॉक्सचा वाढता संसर्ग पाहता भारतातही सावधगिरी बाळगली जात आहे. केंद्राने शनिवारी या प्रकरणी एक अॅडव्हायझरी जारी करुन प्रभावित देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे निर्देश दिलेत. तसेच लक्षणे दिसणाऱ्या प्रवाशांना तत्काळ विलगीकरणात पाठवण्याचीही सूचना केली आहे.


ब्रिटन, अमेरिका, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, नेदरलँड, इस्त्रायल, ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंडमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळलेत. अवघ्या 2 आठवड्यांत रुग्णांची संख्या 100 च्या वर पोहोचली आहे. तथापि, या आजाराने आतापर्यंत एकही मृत्यू झाला नाही.

मंकीपॉक्समुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. या आजाराचा वाढता संसर्ग पाहता राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (NCDC)व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR)अलर्ट जारी केला आहे. आरोग्य मंत्रालयाने विमानतळ व पोर्टच्या अधिकाऱ्यांना मंकीपॉक्स प्रभावित देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवून लक्षणे असणाऱ्या रुग्णांना तत्काळ विलगीकरणात पाठवण्याचे निर्देश दिलेत. तसेच त्यांचे नमुणे तत्काळ पुणे स्थित नॅश्नल इंस्टीट्युट ऑफ व्हायरोलॉजीला (एनआयव्ही) पाठवण्याचीही सूचना केली आहे.

डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, मंकीपॉक्स सारखा दुर्मिळ संसर्ग आपसूकच बरा होतो. पण, काही निवडक लोकांसाठी तो धोकादायक ठरू शकतो. या लोकांत छोटी मुले, गरोदर महिला व अत्यंत दुबळी इम्यूनिटी असणाऱ्या लोकांचा समावेश आहे. 5 वर्षांहून छोट्या मुलांना त्याचा लवकर संसर्ग होतो.

मंकीपॉक्सची लागण झालेल्या बहुतांश रुग्णांचा आफ्रिकन देशांशी कोणताही संबंध नसल्यामुळे जागतिक आरोग्य संघटना काळजीत पडली आहे. कारण, हा व्हायरस प्रामुख्याने मध्य व पश्चिम आफ्रिकी देशांत आढळतो. नायजेरिया, घाणा व डीआर कांगो सारख्या देशांत याचे रुग्ण मिळणे सर्वसामान्य गोष्ट आहे.

मंकीपॉक्स एक व्हायरल इन्फेक्शन आहे. हा संसर्ग 1958 मध्ये सर्वप्रथम बंदिस्त वानरांत आढळला होता. 1970 मध्ये त्याचा मनुष्याला संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. त्याचा व्हायरस कांजिण्या (चिकनपॉक्स) च्या व्हायरसच्या कुटुंबातील सदस्य आहे.

मंकीपॉक्सचा संसर्ग डोळे, नाक व तोंडाच्या माध्यमातून पसरतो. हा रुग्णाचे कपडे, भांडी व अंथरुनाला स्पर्ष केल्यानेही पसरतो. याशिवाय, वानर, उंदीर, खारीसारख्या प्राण्यांनी चावल्यास किंवा त्यांच्या रक्ताच्या संपर्कात आल्यानेही मंकीपॉक्सचा संसर्ग होतो.