बीड

शिवसेनेच्या आरोपांवर शिंदेचे प्रत्युत्तर! म्हणाले, महाराष्ट्राचे तीन तुकडे

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 July :- महाराष्ट्राचे तुकडे हा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. पण मुंबईकर आणि महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे. त्यांना सगळं कळतं. कोणी काही बोलो. आम्ही त्यावर बोलणार नाही. आम्ही आमचे काम करणार आहोत. त्यांच्या बोलण्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आरोपांना प्रत्युतर दिले. गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कर्नाटकातील भाजपच्या एका मंत्र्याने महाराष्ट्राचे तीन तुकडे करून तीन वेगळी राज्ये निर्माण करण्याचा विचार दिल्लीच्या मनात असल्याचे जाहीरपणे म्हटले होते. यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेने सीमाप्रश्नावरून मुख्यमंत्री शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आज शिवसेनेच्या मुखपत्र सामनातून महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे मनसुबे भाजप तडीस नेईल,’ असा घणाघात शिवसेनेने केला आहे. यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले.

संजय राऊतांना टोला नाशिकमध्ये बोलताना संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थ आमदारांवर टीका केली होती. खोकी घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्त्युत्तर दिले. ते म्हणाले की, कसले पन्नास खोके, मिठाईचे की कसले? नगरसेवकही इकडे तिकडे जायला घाबरतात. मात्र आमदार त्यांचे कर्तव्य पार पाडू शकत नाही, अशी स्थिती झाली होती.

आम्ही काहीही चुकीचे केले नाही बंडखोरीबाबत केलेल्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आम्ही गद्दारी केली नाही, तर आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले की अन्याय सहन करायचा नाही. ही गद्दारी नाही तर क्रांती आहे. सभागृहात सावरकारांबाबत बोलू दिले जात नव्हते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात होतो.

अडीच वर्षापूर्वी जे सरकार स्थापन झालं होतं ते आता झालं. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आम्ही काहीही चुकीचे केले नाही. आम्हीच शिवसेना आहोत हे लवकरच सिद्ध होईल. जे अडीच वर्षापूर्वी स्थापन व्हायला हवे होते, ते सरकार आम्ही आता स्थापन केले आहे. मविआ सरकारमध्ये सावरकरांवर आम्ही बोलू शकत नव्हतो. सभागृहात तोंड दाबून बुक्‍क्‍याचा मार खाल्ल्याचेही ते म्हणाले.

कर्नाटक मंत्र्यांचे विधान कर्नाटकातील ज्येष्ठ मंत्र्याने एक धक्कादायक वक्तव्य केले होते. 2024 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हे केंद्रात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्राचे दोन तुकडे करायचे, अशी भारतीय जनता पक्षाची योजना आहे, असे धक्कादायक वक्तव्य भाजपचेच राज्य असलेल्या कर्नाटकातील ज्येष्ठ मंत्री उमेश कत्ती यांनी केले होते. उमेश कत्ती हे कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत.

देशाचा कारभार चांगल्या पद्धतीने करता यावा, यासाठी 50 नवीन राज्ये निर्माण करायची अशी मोदींची योजना आहे. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येतील. त्यानंतर महाराष्ट्राचे दोन, कर्नाटकचे दोन आणि उत्तर प्रदेशचे पाच तुकडे करुन नवी राज्ये स्थापन करण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले होते.

शिवसेनेचे आरोप दिल्ली दौऱ्यावरुन सामनातून शिंदे यांच्यावर खोचक टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री दिल्लीस निघाले आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडावी इतकेच. त्यांच्या गटाला मंत्रिपदे वाढवून मिळावीत यासाठीच हा दिल्ली दौरा असेल तर काहीच बोलायचे नाही. भाजपच्या ‘हो’ला ‘हो’ केलेत तर मुंबई हातची जाईलच, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे मनसुबे भाजप तडीस नेईल,’ असा घणाघात शिवसेनेने केला आहे.