महाराष्ट्र

तोपर्यंत हनीमून नाही: नवदाम्पत्याचा अजब निर्णय!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 July :- कोण कधी काय करेल अन् काय ठरवेल याचा नेम नाही, असाच पण कोल्हापूरच्या एका नवदाम्पत्याने केला. जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत नाही, तोपर्यंत हनीमून नाही असा निर्णय नवविवाहितांनी घेतला. गुरुवारी कोल्हापूर शहरातील एका अजब लग्नाची गजब वरात निघाली. या वरातीची खूप चर्चाही झाली.

नवऱ्या मुलाने हुंड्यात चक्क पाणी भरलेला टॅंकर मागितला. इतकेच नाही तर त्याच पाण्याच्या टॅंकरवरुन या दाम्पत्याची वरात निघाली. एवढ्यावरच थांबले नाही तर पठ्ठ्याने जोवर भागात पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत हनीमूनला जाणार नाही असे जाहीर करून टाकले. लग्नाच्या वरातीतून थेट महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात आंदोलनच छेडले होते.

कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगळवार पेठे परिसरात नेहमीच पाण्यासाठी आंदोलने होतात. येथील प्रिन्स क्लब, खासबागचे कार्यकर्ते विशाल कोळेकर आणि अपर्णा साळुंखे हे गुरुवारी विवाहबद्ध झाले. त्या निमित्ताने त्यांची महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, खासबाग परिसरातून अभिनव पद्धतीने चक्क पाण्याच्या टँकरवरुनच वरात काढण्यात आली.

महिला व मुले डोक्यावर रिकाम्या घागरी घेऊन, पारंपरिक हलगीच्या तालावर नाचत होते. पाण्याच्या टँकरवर बसलेल्या वधू वराच्या मागे मोठ्या फलकावरील “महापालिकेच्या नळाला नियमित पाणी येत नाही. म्हणून बायकोला त्रास नको. त्यासाठी हुंडा म्हणून, आम्ही पाण्याचा टँकर घेतलाय !” असा मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

“जोपर्यंत खासबाग परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही.” असे आणखी एक फलक टॅंकरवर होते. या मजकूराने सर्वांचे लक्ष वेधले होते. बघणाऱ्यांना हा अजब प्रकार पाहून हसावे की रडावे हेच कळत नव्हते.

लग्नाची ही वरात रात्री उशिरा नवरदेवांच्या गल्लीत पोहोचल्यावर नवदांपत्यांनी टँकरची पाईप हातात घेऊन, घरात पाणीपुरवठा केला. या अजब लग्न मिरवणुकीचे संयोजन सचिन साबळे, अमित पोवार, रमेश मोरे, अभिजीत पोवार, संजय पिसाळे, संदीप पोवार, अशोक पोवार आदी कार्यकर्त्यांनी केले.

आपल्या या अजब लग्नाची कहाणी सांगताना नवरदेव विशाल कोळेकर म्हणाले, आमच्या परिसरात चार दिवसांतून एकदा पाणी येते…. ते पण अपुरे… यामुळे माझीच नाही तर संपूर्ण भागातील नागरिकांची गैरसोय होते. वारंवार तक्रार करूनही महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दखल घेतली जात नाही. म्हणून मी सासऱ्याकडे पाणी भरून टॅंकर हुंड्यात​​​​ मागितला.