News

कार्यकर्त्यांना सारखी गाजरं दाखवावी लागता, अजित पवारांचा भाजपला टोला

कराड, 25 नोव्हेंबर : ‘महाविकास आघाडी सरकार पुढील दोन महिन्यात कोसळणार’ असं भाकीतच भाजपचे (BJP) नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी वर्तवलं होतं पण ‘कार्यकर्ते बरोबर राहण्यासाठी, आमदारांमध्ये चलबिचल न होण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी सारखी गाजरं दाखवावी लागतात’ असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सणसणीत टोला लगावला.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कराडमध्ये आले होते. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केल्यानंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांना चांगलेच फटकारून काढले.

‘कोणतेही सरकार सत्तेत आले की, त्यांच्या विरोधात असलेल्या विरोधी पक्षाला वारंवार काही तरी विधानं करावी लागतात. कार्यकर्ते बरोबर राहण्यासाठी, आमदारांमध्ये चलबिचल न होण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी सारखी गाजरं दाखवावी लागतात.त्यामुळे भाजप नेते सारखे सरकार पडण्याची भाषा करत आहे’ असा सणसणीत टोला पवारांनी भाजपला लगावला.

‘आता महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष झाले आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. त्यांचे आशिर्वाद आहे, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही’ असंही पवारांनी स्पष्ट केले.

तसंच, ‘चंद्रकांत पाटील यांनी कुणी सांगितले आहे, आम्ही स्वप्न पाहत आहोत. आम्ही स्वप्न पाहत नाही तर थेट कृती करण्याचे काम करतो. त्यांना कधी कळलं आम्हाला स्वप्न पडली. मुळात 105 आमदार असताना सरकार बनवता आलं नाही. हे त्याचं खरं दुखणं आहे, म्हणून सारख्या काट्या पेटवतात’ असा टोलाही अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

‘राज्यात कोरोनाचे संकट आले, निसर्ग चक्रीवादळ आले, परतीच्या पावसाचे संकट आले अशी अनेक संकट आली, या संकटातून मार्ग काढत सरकार पुढे चालले आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे सर्वांना माहिती आहे, सरकार व्यवस्थिती पद्धतीने काम करत आहे’ असंही अजितदादांनी सांगितले.

‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार काम करत आहे. प्रवेशाबाबत लवकरच जीआर काढला जाणार आहे, दोन दिवसात निर्णय घेतला जाईल’ अशी माहितीही पवारांनी दिली.

ईडीच्या कारवाई दरम्यान केंद्र सरकार कशा पद्धतीने, कुठल्या फोर्सची मदत घेतात त्यांचा निर्णय असतो. शरद पवार यांनी या कारवाईबाबत मत व्यक्त केलं आहे. त्यांनी जी भूमिका मांडली आहे ती पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे आपण वेगळे काही बोलण्याची गरज नाही, असंही पवारांनी स्पष्ट केले.

‘वीज बिलाच्या संदर्भात अभ्यास सुरू आहे. 59 हजार कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. गेल्या सरकारमुळे महावितरण अडचणीत आले आहे. कोरोनात राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनली. 29 हजार कोटी रुपये केंद्राकडून येणं बाकी आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवून देखील नैसर्गिक संकटात केंद्र राज्याच्या पाठीशी उभा राहील नाही. केंद्राने सर्व राज्यांना देश म्हणून समान वागणूक दिली पाहिजे, ती सध्या दिसत नाही, आपल्या पक्षाचे सरकार नाही म्हणून निधी देताना भेदभाव होतो, अशी टीकाही अजितदादांनी केंद्र सरकारवर केली.