बीड

खडसेंची नाराजी आणि भाजपमधील गटबाजीवर विनोद तावडे प्रथमच बोलले!

अहमदनगर: ‘राज्यातील भारतीय जनता पक्ष हा एक संघ आहे. कुठलीही फळी नाही. राज्यात तसं कुठलंही वातावरण नाही,’ असं मत माजी मंत्री व भाजपचे नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे. (Vinod Tawde on Eknath Khadse)

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा फेटाळून लावली.

एकनाथ खडसे हे नाराज असून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ‘भाजपचं नुकसान होईल असं काहीही नाथाभाऊ करणार नाहीत हा ठाम विश्वास मला आहे,’ असं तावडे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल करत आहेत. फडणवीसांनी मला त्रास दिल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. राज्यात भाजपची सत्ता न येऊ शकल्याबद्दल त्यांनी फडणवीसांना दोष दिला होता. ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेमुळं राज्यात भाजपचं सरकार आलं नाही की काय, याचा शोध घेत असल्याचं खडसे यांनी म्हटलं होतं. खडसे यांनी थेट फडणवीसांवर आरोप केल्यानं त्यांच्या पक्षांतरांच्या चर्चेला ऊत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी तावडे यांनी हा प्रश्न विचारला होता.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत, असा विश्वास अलीकडंच व्यक्त केला आहे. ‘खडसे हे जुने-जाणते नेते आहेत,’ असं ते म्हणाले होते.