News

राहुल गांधीच काँग्रेसला वाचवू शकतात; ‘या’ नेत्याला ठाम विश्वास

मुंबई: ‘आताच्या परिस्थितीत काँग्रेसला कोणी वाचवू शकत असेल तर ते राहुल गांधीच वाचवू शकतात. त्यामुळं इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा राहुल यांनीच अध्यक्ष व्हावं. काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा,’ असं मत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केलं आहे.

संजय निरुपम हे नेहमीच राहुल गांधी यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आहेत. आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर आला असल्यानं ते राहुल गांधी यांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. राजधानी दिल्लीत आज काँग्रेसच्या कार्यकारी समितीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यात पक्षाच्या नेतृत्वावर जोरदार खल होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नव्या नेतृत्वाची मागणी केली आहे.

त्यावरून राहुल समर्थक व विरोधक आमनेसामने आले आहेत. हे पत्र म्हणजे दुसरेतिसरे काही नसून राहुल गांधी यांच्या विरोधातील कारस्थान आहे, असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. ‘पत्र लिहिणाऱ्यांपैकी अनेक नेते राहुल यांच्या विरोधात याआधीही कारस्थानं करत होते. ही कारस्थानं कधी काँग्रेसच्या कार्यालयात, कधी नेत्यांच्या घरात तर कधी इतर कुठेतरी बंद दाराआड होत होती. आता ते सगळं पत्ररूपानं बाहेर आलंय. राहुल यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्याचा किंवा त्यांच्या विरोधात मोहीम राबवण्याचा हा प्रयत्न आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

‘काँग्रेसला कोणी वाचवू शकत असेल तर ते राहुल गांधीच वाचवू शकतात. त्यामुळं त्यांनीच अध्यक्ष व्हायला हवं. अन्य कोणी नाही. हे पत्र लिहिणाऱ्यांनी राहुल यांना पाठिंबा दिला असता तर काँग्रेसचं जास्त भलं झालं असतं,’ असं निरुपम यांनी म्हटलं आहे.

नेत्यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस कार्यसमितीच्या निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. त्यावरही निरुपम यांनी तोफ डागली आहे. ‘आताची वेळ पक्षांतर्गत निवडणुकांची नाही. काँग्रेस कार्यकारी समितीची निवड व इतर पक्षांतर्गत निवडणुका हे काँग्रेसला बरबाद करण्याचं मोठं कारस्थान आहे. राहुल यांच्या नेतृत्वावर सतत हल्ला करत राहण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळंच मी पत्राचा मी विरोध करतो. राहुल गांधी अध्यक्ष असताना ते अयशस्वी कसे होतील यासाठी प्रयत्न करणारेच ते पुन्हा अध्यक्ष होऊ नयेत म्हणून प्रयत्न करत आहेत,’ असंही निरुपम म्हणाले.