Newsक्राईम

विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात अटक

मुंबई: संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या उत्तर प्रदेशातील पोलीस हत्याकांडातील दोन आरोपींना ठाण्यातील कोलशेत येथून अटक करण्यात आली आहे. अरविंद ऊर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी आणि सुशीलकुमार ऊर्फ सोनू सुरेश तिवारी अशी आरोपींची नावे असून हे दोघे गँगस्टर विकास दुबेचे साथीदार आहेत. दरम्यान, या हत्याकांडातील आणखी किमान १० आरोपी फरार असून उत्तर प्रदेश पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (महाराष्ट्र एटीएस) केलेल्या धाडसी कारवाईत विकास दुबेच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या कारवाईबाबत एटीएसचे उपायुक्त विक्रम देशमाने यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. विकास दुबे एन्काउंटरमध्ये मारला गेल्यानंतर त्याची टोळी उद्ध्वस्त करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी कंबर कसली आहे. आतापर्यंत विकास दुबेसह टोळीतील ६ गुंडांना चकमकीत मारण्यात आले आहे.

‘विकास दुबे या गुंडाला अटक करण्यासाठी पोलीस गेले असता त्याच्या साथीदारांनी केलेल्या गोळीबारात ८ पोलिसांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडातील अनेक आरोपी फरार असून त्यातील एक आरोपी ठाण्यात लपला असल्याची खात्रीशीर माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला होता. या सापळ्यात अरविंद ऊर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी हा आरोपी अलगद अडकला. त्याला व त्याचा वाहनचालक सुशिलकुमार ऊर्फ सोनू सुरेश तिवारी या दोघांना ठाण्यातील कोलशेत येथून अटक करण्यात आली आहे. याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांना कळवण्यात आले आहे,’ असे विक्रम देशमाने यांनी यांनी नमूद केले.

उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यात देशाला हादरवणारं हे हत्याकांड घडलं होतं. दुबे गँगच्या हल्ल्यात ८ पोलीस शहीद झाले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी दुबे गँगविरुद्ध धडक कारवाई सुरू केली असून विकास दुबे शुक्रवारी पोलीस चकमकीत मारला गेला आहे. पोलीस हत्याकांड प्रकरणी अरविंद ऊर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी आणि त्याचा ड्रायव्हर सुशिलकुमार ऊर्फ सोनू सुरेश तिवारी हे दोघे वॉन्टेड होते. त्यांना अटक करण्यात आल्याने दुबेचे अनेक कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची २००१ मध्ये हत्या झाली होती. त्याप्रकरणातही हे दोघे वॉन्टेड होते, असे पोलिसांनी सांगितले.