एसटी ओलांडणार जिल्ह्याची वेस; जिल्हाबंदीतून ‘अशी’ होणार सुटका!
चंद्रपूर: मागील चार महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील आंतरजिल्हा एसटी बससेवा कोविड बाबतचे नियम पाळून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती
राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. मुख्यमंत्री यासंदर्भात अनुकूल असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चाही झाली आहे. पुढील आठवड्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ( Vijay Wadettiwar On Inter District ST Bus Service )
राज्यातील कोचिंग क्लासेस करोना नियम पाळून प्रारंभ करण्याची सरकारची तयारी आहे. ज्याप्रमाणे जीम सुरू केले, त्याच धर्तीवर नियम लाऊन कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा विचार आहे, अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. ऐन संकटकाळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा सोडणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले आहे.
दरम्यान, लॉकडाऊन सुरू झाले तेव्हाच राज्यातील एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. अनलॉक प्रक्रिया सुरू होऊन अनेक निर्बंध शिथील होत असताना मर्यादित एसटी सेवेलाही परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सध्या ५० टक्केच प्रवासी, या अटीवर एसटी धावत आहेत. ही बससेवा फक्त जिल्हांतर्गत आहे. जिल्ह्याची वेस ओलांडण्याची परवानगी सध्या एसटीला नाही. वडेट्टीवार यांनी दिलेली माहिती लक्षात घेता एसटीला असलेली जिल्हाबंदी लवकरच उठण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकप्रकारे प्रवाशांनाही जिल्हाबंदीतून काही अंशी दिलासा मिळणार आहे.
लोकलबाबत दिली होती महत्त्वाची माहिती
मुंबईत सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकलसेवा सुरू आहे. बाकी प्रवाशांसाठी लोकलची दारे बंद आहेत. बहुतेक कार्यालये व व्यवहार सुरू झाले असल्याने कामावर जाणाऱ्या सर्वांचीच लोकलअभावी कोंडी होत आहे. या प्रश्नावर नालासोपारा येथे रेल्वे रुळांवर उतरून हजारो प्रवाशांनी संतप्त आंदोलनही केले होते. लोकल पूर्ववत सुरू करा, अशी मागणी जोर धरत आहे. या अनुषंगाने लोकल नेमकी कधी सुरू होणार असे विचारले असता वडेट्टीवार यांनी महत्त्वाची माहिती दिली होती. मुंबईतील उपनगरीय लोकलसेवेबाबत प्रमुख मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली आहे. दोन दिवसांत याबाबत पुन्हा बैठक होणार असून त्यात सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे, असे वडेट्टीवार शुक्रवारी म्हणाले होते. त्याचवेळी राज्यात जीम सुरू करण्याबाबतही त्यांनी शुभवार्ता दिली होती.