बीड जिल्हयातील शहीदांच्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष, हे दुर्दैवी आणि अक्षम्य – प्रितम मुंडे
भाग्यश्री राख यांच्यासह शहीदांच्या १५ कुटुंबियांना कधी न्याय मिळणार?
बीड दि. शासन निर्णयानुसार जमीन मिळावी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून खेटे घालणा-या भाग्यश्री राख या शहीद जवानांच्या पत्नीकडे होत असलेले दुर्लक्ष हे दुर्दैवी आणि अक्षम्य आहे अशी खंत व्यक्त करत खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी भाग्यश्री राख यांच्यासह जिल्हयातील शहीदांच्या १५ कुटुंबियांना कधी न्याय मिळणार असा सवाल उपस्थित केला आहे.
पाटोदा तालुक्यातील थेरला येथील जवान तुकाराम राख हे १ मे २०१० मध्ये ऑपरेशन रक्षकमध्ये शहीद झाले होते. राज्यात भाजपचे सरकार असताना शासनाने २८ जुन २०१८ ला अध्यादेश काढून त्यानुसार शहिदांच्या वारसांना शासनाकडून २ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शहीद जवान राख यांच्या पत्नी भाग्यश्री राख यांनी सर्व कागदपत्रे जमा करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमीन मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला. गेल्या दोन वर्षांपासून त्या जमीन मिळण्यासाठी खेटे घालत आहेत परंतू आज या, उद्या या असे म्हणून प्रशासन वेळ मारून नेण्यापलिकडे काहीही करत नाही. शासन निर्णयानुसार जमीन मिळण्यासाठी जिल्हयातील शहीदांच्या अशा १५ कुटुंबियांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. भाग्यश्री राख यांना प्रशासना बरोबरच सत्ताधारी मंत्र्यांनी देखील आठ दिवसांत प्रकरणं निकाली काढतो म्हणून आश्वासन दिले पण काहीच केले नाही. शेवटी या सर्वाना कंटाळून त्यांनी उद्या स्वातंत्र्यदिनी जीव देण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हयातील शहीदांच्या कुटुंबियांकडे सत्ताधारी मंत्री आणि प्रशासनाने केलेले दुर्लक्ष हे दुर्दैवी आणि अक्षम्य आहे. जनतेच्या प्रश्नांविषयी केवळ मोठमोठ्या गप्पा मारणा-या या मंत्र्यांना शहीदांच्या कुटुंबियांकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशी खंत व्यक्त करत या कुटूंबांना कधी न्याय देणार असा सवाल खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी उपस्थित केला आहे.