भारत

राहत इंदौरींना मौत का बुलावा!

11 Aug :- लोकप्रिय गझलकार, प्रसिद्ध शायर याशिवाय इश्क, मिशन काश्मीर, मुन्नाभाई एमबीबीएस, मर्डर अशा अनेक चित्रपटांची गाणी अजरामर करणारी राहत इंदौरी यांच निधन झाले आहे. आज हमने दिल का हर किस्सा (सर), चोरी चोरी जब नजरे मिली (करीब), ये रिश्ता क्या कहलता है (मीनाक्षी), धुआ धुआ (मिशन काश्मीर), दिल को हजार बार (मर्डर) अशी अनेक अर्थपूर्ण गाणी त्यांच्या लेखणीतून उतरली. ऋत, मौजूद, नाराज अशा पुस्तकांचे लेखन करणाऱ्या राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाली होती.

त्यांच्यावर उपचार सुरु असताना, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी प्राणज्योत मालवली. ते 70 वर्षांचे होते. राहत इंदौरी यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं आजच सोशल मीडियावरुन सांगितलं होतं.“कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी कोरोना चाचणी करण्यात आली. तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मी अरविंदो हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे.

या आजाराचा मी लवकरात लवकर पराभव करावा, अशी प्रार्थना करा. आणखी एक विनंती आहे, मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करु नका, आपणास माझ्या प्रकृतीची माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळेल.” असे ट्वीट त्यांनी आज सकाळी केले होते.राहत इंदौरी यांना इंदौरच्या अरविंदो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हे कोव्हिड रुग्णालय आहे. राहत इंदौरी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या मुलाने सकाळी दिली होती. इंदौरी यांचे वय 70 वर्षे असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.