बीड

माजी मंत्री जानकर राबताहेत शेतात; तण काढताहेत, औत चालवताहेत

बीड: पाच वर्ष राज्यात कॅबिनेट मंत्रीपद उपभोगल्यानंतर पुन्हा सत्तेच्या आसपास राहण्याचा अनेक नेते प्रयत्न करत असतात. मात्र, माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर त्याला अपवाद आहेत. सत्तेच्या कोणत्याही पदासाठी सेटिंग्ज न लावता थेट शेतात काम करण्यावर त्यांनी भर दिला आहे. सामान्य शेतकऱ्याप्रमाणे शेतात तण काढण्यापासून ते औत धरण्यापर्यंतची सर्व कामे जानकर करत आहेत. त्यामुळे माजी मंत्री आणि विद्यमान आमदाराला शेतात काम करताना पाहून भल्याभल्यांना आश्चर्य वाटत आहे.

महादेव जानकर सध्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गुंठेगाव येथे आले आहेत. त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांच्याकडे ते उतरले आहेत. मात्र कार्यकर्त्याच्या घरी आल्याने ते स्वस्थ बसलेले नाहीत. लॉकडाऊनमुळे गुंठेगावात अडकून पडावं लागल्याने जानकर हे सध्या वाघमोडे यांच्या शेतात राबत आहेत. वाघमोडे यांच्या शेतात ते पहाटेच जातात. औत ओढण्यापासून ते शेतातील तण काढण्यापर्यंतची कामं ते करत आहेत. या शिवाय सीताफळाची लागवड असो की घरात पाणी भरणं असो कोणताही अविर्भाव न ठेवता ते ही कामं करत आहेत.

दिवसभर शेतात राबल्यानंतर जानकर हे वाघमोडे कुटुंबासोबत जमिनीवर बसूनच जेवण करतात. गावातून शेतात जाण्यासाठी बैलगाडीचाच वापर करतात. गावातील टपरीवर स्वत: चहा बनवून स्वत:ही पितात आणि इतरांनाही देतात, असं वाघमोडे यांनी सांगितलं. गेल्या ३६ दिवसांपासून ते आमच्या शेतात राबत आहेत. आम्ही त्यांना काम करण्यास मनाई करतो. पण मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे, असं सांगत ते शेतात काम करतात. त्यामुळे आम्हाला त्यांना अडवता येत नाही, असं वाघमोडे यांनी सांगितलं.

अर्धी गाडी गवत कापले

एकदा जानकर नववीत शिकणाऱ्या रितेश अशोक वाघमोडे सोबत रानात गेले होते. रितेशला घरी गवत न्यायचे होते, त्यामुळे त्याने गवत कापायला सुरुवात केली. ते पाहून जानकर यांनीही मीही तुला मदत करतो असं म्हणत गवत कापलं. थोडथोडकं नव्हे तर अर्धी गाडी गवत कापलं.

असा आहे दिनक्रम

जानकर यांचा दिवस पहाटे ५ वाजता सुरू होतो. सकाळी व्यायाम केल्यावर अध्यात्मिक ग्रंथांचं वाचन करतात. त्यानंतर शेतात काम करतात. टीव्ही बघत नाहीत, असं सांगतानाच एवढ्या दिवसात एकदाच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलो होतो, असं जानकर यांनी सांगितलं.