३१ जुलैनंतर लॉकडाऊन उठणार का? उद्धव ठाकरे म्हणाले…
मुंबई: करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात असलेल्या लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ‘येत्या १ ऑगस्टपासून लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथिल केले जातील,’ असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक काल पार पडली. या बैठकीत उद्धव यांनी लॉकडाऊन संदर्भात आपली भूमिका मांडली. राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतर नेमकं काय होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. या सर्वांनाच दिलासा देण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ‘मुंबई आणि आसपासच्या परिसरात आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याचे काम सुरू आहे. सध्या असलेले निर्बंध आणखी शिथिल केले जातील. याला लॉकडाऊन म्हणण्याऐवजी अनलॉकडाऊन म्हणणं योग्य ठरेल,’ असंही उद्धव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट केलं. ‘ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढत असल्यानं तिथे अधिक कठोर उपाययोजना कराव्या लागतील,’ असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
‘३१ जुलै नंतरच्या लॉकडाऊन संदर्भात केंद्र सरकारकडून नेमक्या काय सूचना येताहेत त्याची राज्य सरकार वाट पाहत आहे. केंद्र सरकार सध्याचे निर्बंध उठवेल आणि इतर सर्व अधिकार राज्य सरकारकडे सोपवेल अशी आमची अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या त्या सूचनांनुसारच राज्य सरकार लॉकडाऊनची सुधारीत नियमावली जाहीर करेल,’ असं प्रशासकीय वर्तुळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.
‘हॉटेल, व्यायामशाळा, स्विमिंग पूल आणि बसेसना केंद्र सरकार परवानगी देईल असं वाटत नाही. कारण, तिथे सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होण्याची भीती आहे. सर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वे गाड्या (लोकल वाहतूक) सुरू होईल का, याबाबतही साशंकता आहे. रेल्वे बोर्डाला त्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल,’ असंही त्या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.