बीड

दु:खाच्या डोहावरील,आधाराचा सेतु निरपेक्ष प्रेमामागे,ना कुठला हेतू ।

नऊ वर्षानंतर झाला बहिण -भावामध्ये सुसंवाद


बीड,दि.27(प्रतिनिधी):-बीड जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात लोकप्रिय नेते आणि दोघांमध्ये बहिण भावाचे नाते. पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये तब्बल नऊ वर्षानंतर सुसंवाद झाला. स्वत: मोठ्या भावाने ही माहिती दिली.राजकिय मतभेदाची भिंत काही काळा पुरती का होईना कोसळली आणि या निमित्ताने दोघांच्याही चाहत्यांच्या मनातील सुप्त इच्छा पुर्ण झाली.

बीड जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. या गंभीर आजारातून ते मुक्त झाल्यानंतर दिलेल्या पहिल्या जाहिर मुलाखतीत त्यांनी बहिण पंकजाताई मुंडे यांनी पाच वेळा माझ्या प्रकृतीची विचारपुस केल्याचे सांगितले. ही घटना माझे मनोबल वाढवणारी होती. 2011 पासून आमच्या नात्यामध्ये राजकिय मतभेदामुळे अंतर पडले. मध्ये काही दु:खाच्या प्रसंगात एकत्र आलो. परंतु कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराशी लढत असताना बहिणीने दाखवलेली माया नाते संबंधाला उजाळा देणारी आहे. आणि माझा पहिल्या पासून हा प्रयत्न राहिल्याचे त्यांनी सांगितले.
परळीचे मुंडे घराणे हे महाराष्ट्राचे मोठे राजकिय शक्तीपीठ बनले आहे. या एकाच घराने बीड जिल्ह्याला तीन पालकमंत्री दिले.15 वर्षापासून या घराण्याकडे जिल्ह्याची खासदारकी आहे.राजकिय सत्ता संघर्षातून दुरावलेली ही नाती जर नेहमी करता जवळ आली तर राज्याचे राजकारण सुध्दा वेगळ्या दिशेला जावू शकते. कोरोनाच्या आपत्तीतून तुर्तास नाते जवळ आल्याची इष्टापत्ती निर्माण झाली आहे. बहिण भावाच्या अजरामर नात्याचा एक नवा इतिहास या निमित्ताने लिहिला जावू शकतो. एका कवीने बहिणीचा महिमा सांगताना म्हटले होते बहिण म्हणजे मायेचं साजुक तुप, आईचं दुसरं रुप, काळजी रुपी धाक, प्रेमळ तिची हाक,कधी बचावाची ढाल, कधी मायेची शाल,दु:खाच्या डोहावरील आधाराचा सेतु, निरपेक्ष प्रेमामागे ना कुठला हेतू.
पंकजाताईंनी पाच वेळा फोन केला. धनंजय मुंडे यांनी त्याचा स्विकारही केला.या निमित्ताने एव्हढेच घडावे
‘भाव’ द्यावा की न द्यावा,
ज्याचा त्याचा प्रश्‍न असावा,
बहिण नावाचे बीज जपुया,
किमान इतका ‘भाव’ दिसावा ।