देश विदेश

सामन्यादरम्यान चेंगराचेंगरीत 174 ठार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Oct :- इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 174 जणांचा मृत्यू झाला, तर 180 जण जखमी झाले आहेत. पूर्व जावा येथील कंजुरुहान स्टेडियममध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, इंडोनेशियनच्या बीआरआय लीग-1 मध्ये अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यात सामना सुरू होता. पर्साबयाचा संघ हरला. सामना हरलेल्या संघाचे समर्थक मैदानात उतरले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुर सोडावा लागला आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

पोलिसांनी सांगितले की, या घटनेत 174 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी दोन पोलिस अधिकारी आहेत. स्टेडियममध्ये 34 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि बाकीचे रुग्णालयात होते. या घटनेचे व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये चाहते सुरक्षा कर्मचाऱ्यांवर वस्तू फेकताना दिसत आहेत. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडोनेशिया (PSSI) ने एक निवेदन जारी करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

खेळानंतर काय झाले याची चौकशी करण्यात येणार असून त्यासाठी एक टीम मलंगला रवाना झाल्याचे PSSIने सांगितले. पीटी लीगा इंडोनेशिया बारू (LIB) चे अध्यक्ष अखमद हादियान लुकिता यांनी सांगितले की, या घटनेमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. आशा आहे की हा आपल्या सर्वांसाठी एक धडा असेल.