महाराष्ट्र

रश्मी ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात; टेंभीनाक्यावर करणार देवीचा जागर

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Sept :- शिवसेना कुणाची यावरून शिंदे आणि ठाकरे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता रश्मी ठाकरे यांनीही शिंदे समर्थकांविरोधात कंबर कसली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त रश्मी ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाणार आहेत.

रश्मी ठाकरे उद्या ठाण्याच्या टेंभीनाका इकडे जाऊन देवीची आरती करणार आहेत. दरवर्षी रश्मी ठाकरे टेंभीनाक्याला देवीच्या दर्शनाला येत असतात. तोच शिरस्ता कायम राखत रश्मी ठाकरे उद्या दुपारी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह टेंभीनाक्यावर येऊन देवीचा जागर करणार आहेत.

शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या आरती सोहळ्याला देखील रश्मी ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मुख्य म्हणजे टेंभीनाक्याच्या नवरात्रोत्सवाचे आयोजक हे शिंदे गटाचे आहेत. देवी सर्वांची आहे, देवीच्या दर्शनाला जे येतील त्यांचं स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया आयोजकांकडून देण्यात आली आहे. रश्मी ठाकरे या उद्या ठाण्यात येत असल्यामुळे ठाकरे आणि शिंदे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

दरम्यान रश्मी ठाकरे यांच्या या ठाणे दौऱ्यावर शिंदे गटात गेलेल्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी टोला लगावला आहे. ‘अरेरे..मा.रश्मी वहिनी ठाण्याला जाणार आहेत म्हणून शिल्लक सेनेला असे msgs करुन मुंबई मधून महिला गोळा करुन गर्दी दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करावा लागत आहे…’ असं ट्वीट करत शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या एका व्हॉट्सऍप ग्रुपचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.