दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा मेगा प्लॅन; अब्दुल सत्तारांकडून 300 बस बुक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
26 Sept :- आगामी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटत चालले आहे. मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून आपापल्या पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त ‘गर्दी’ जमवण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. एकट्या अब्दुल सत्तार यांच्याकडून 300 एसटी बुक करण्यात आल्या आहेत. पाच ऑक्टोंबरला सर्व बसेस औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
औरंगाबादमध्ये शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, एकीकडे मतदार संघामध्ये बैठका घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी एक पत्र आगार प्रमुखांना लिहले असून, त्यामध्ये त्यांनी सुसज्ज 300 बसेसची मागणी केली आहे. सिल्लोडपासून ते मुंबईपर्यंत बसेस येत्या पाच तारखेला देण्यात याव्यात असे पत्र सत्तारांनी आगार प्रमुखांना दिले आहे. त्यामुळे 300 बसेस या सिल्लोडमधून शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी जाण्याची अपेक्षा आहे.
राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदार असलेल्या एकट्या जळगाव जिल्ह्यातूनच मुंबईकडे जाणाऱ्या 3 रेल्वेगाड्या बुक करण्यात येणार आहेत. शिंदे गटाकडून या प्रत्येक ट्रेनसाठी 25 लाख रुपये याप्रमाणे तब्बल 75 लाख रुपये मोजण्यात येणार आहेत. प्रत्येक आमदाराला त्यांच्या -त्यांच्या मतदारसंघातून 2-3 हजार लोक मेळाव्यासाठी आणण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.
अवघ्या राज्यभरातून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी तयारी करण्यात येत असून, उस्मानाबादमधून 60 बसेस बुक करण्यात आल्या आहेत. तर नाशिकमधून 400 बसेस येणार आहेत. वर्धातून 500 ते 1000 शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईत येणार आहेत. अकोल्यातून 20 ट्रॅव्हल्स बसेस बुक करण्यात येणार आहेत. नागपूरमधून 10 बसेस बुक करण्यात आले असून 500 कार्यकर्ते मेळाव्यासाठी जाणार आहेत. रत्नागिरीतून 100 बसेस बुक करण्यात आले असून, 500 ते 700 कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे