भारत

चिनी सैन्याची पूर्व लडाखमधून 3 KM माघार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

17 Sept :- चिनी लष्कराने पूर्व लडाखमधील कळीच्या गोगरा-हॉटस्प्रिंगमधून 3 किमी लांब माघार घेतली आहे. हा खुलासा मॅक्सार टेक्नोलॉजीने जारी केलेल्या उपग्रह छायाचित्रांतून झाला आहे. मे 2020 पासून दोन्ही देशांचे सैन्य या भागांतील पेट्रोलिंग पॉइंट-15 जवळ एकमेकांपुढे ठाण मांडून बसले होते. यामुळे दोन्ही देशांत मोठा तणाव निर्माण झाला होता.

गत 17 जुलै रोजी भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांत कोअर कमांडरस्तरीय चर्चेची 16 वी फेरी झाली. त्यात 8 सप्टेबर 2022 रोजी कळीच्या ठिकाणावरून सैन्य मागे घेण्यावर एकमत झाले. या अंतर्गत दोन्ही देशांच्या लष्कराने सुनियोजितपणे पूर्व लडाखमधील गोगरा-हॉटस्प्रिंग्जमधून (पीपी-15) माघार घेतली.

सॅटेलाइट छायाचित्रांत दिसून येते की, एक वर्षापूर्वी 12 ऑगस्ट 2021 रोजी डिसएंगेजमेंटपूर्वी गोगरा-हॉटस्प्रिंग्ज भागात चीनची एक लष्करी पोस्ट दिसून येत आहे. पण नव्या छायाचित्रात ती त्या ठिकाणी दिसत नाही. या प्रकरणी दोन्ही देशांतील सहमतीनुसार यापुढे या भागात दोन्ही देशांचे सैन्य पेट्रोलिंग करणार नाही.

यापूर्वीच्या सॅटेलाइट फोटोत चिनी लष्कराने एलएसीच्या अलिकडील भारतीय हद्दीत एक इमारत बांधल्याचे दिसून येत होते. चीनच्या 2020 च्या घुसखोरीपूर्वी भारतीय लष्कर या भागात नियमित गस्त घालत होते. दुसरीकडे, 15 सप्टेबर 2022 च्या उपग्रहीय छायाचित्रांत ही इमारत त्या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे चीनने ही पोस्ट दुसऱ्या भागात हलवल्याचे स्पष्ट होत आहे.

लडाखमधील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मते, चीनसोबतच्या तडजोडींतर्गत भारतीय लष्करानेही भारतीय हद्दीतील आपली पोस्ट अलीकडे घेतली आहे. पण दिल्लीतील लष्करी अधिकाऱ्यांनी त्याची पुष्टी केली नाही. लडाखच्या चुशूल क्षेत्राचे नगरसेवक कोंचोक स्टेनजिन यांनी एनडीटीव्हीला बोलताना सैनिकांनी केवळ पेट्रोलिंग पॉइंट 15च (पीपी-15) नव्हे तर पीपी-16 वरूनही माघार घेतल्याचा दावा केला आहे.

या भागात भारतीय सैनिक मागील 50 वर्षांपासून नियमित गस्त घालत होते. पण आता हा भाग बफर झोन बनला आहे. या भागात हिवाळ्यात भारताची गुरेढोरे चारली जात होती. दुसरीकडे, दोन्ही देशांच्या लष्करात डेमचोक व देपसांग भागातील वादावरही तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

चीनने एप्रिल-मे 2020 मध्ये लष्करी सरावाच्या नावाखाली सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी घुसखोरीच्या घटना घडल्या होत्या. भारतानेही या भागात चिनी सैनिकांएवढेच सैन्य तैनात केले होते. त्यानंतर स्थिती एवढी बिकट झाली की 4 दशकांहून अधिक काळानंतर एलएसीवर गोळीबार झाला होता. त्यात 15 जून रोजी गलवान घाटीत चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते.