माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
17 Sept :- माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यामुळे त्यांना नाशिकच्या सुयश खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
नंदुरबार जिल्ह्यातून सलग नऊ वेळा काँग्रेसकडून माणिकराव गावित खासदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावितांना पराभव पत्करावा लागला होता.
नंदुरबार हा आदिवासी पट्टा काँग्रेसचा पांरपरिक बालेकिल्ला मानला जातो. प्रत्येक निवडणुकीत प्रचाराची सुरुवात इंदिरा गांधी या नंदुरबारमधून करत. सोनिया गांधी या राजकारणात सक्रिय झाल्या तेव्हा त्यांची पहिली जाहीर सभा नंदुरबारमध्येच झाली होती. याच मतदारसंघाचे कित्येक वर्षे गावित यांनी प्रतिनिधित्व केले होते.
1965 मध्ये ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा करणार्या माणिकराव गावितांना केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री ही पदे भूषविली होती. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले. 1981 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली व विजयीही झाले. त्यानंतर त्यांनी 2014 पर्यंत पराभव पाहिला नव्हता.
2014 मध्ये सोळाव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला तेव्हाही काँग्रेसच्या पहिल्याच यादीत माणिकराव गावित यांचे नाव जाहीर झाले होते. केवळ दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते.