महाराष्ट्र

बारामतीला धडका मारून काय होणार आहे का? ; अजित पवारांचा भाजपाला टोला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 Sept :- राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केलं आहे. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मंगळवारी मतदारसंघाचा दौरा केला. तर, भाजपचे मिशन भारत सुरु आहे. त्यामध्ये बारामती सुद्धा येते, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होते. त्यावरून आता अजित पवार यांनी बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांचा कमी शब्दांमध्येच समाचार घेतला आहे.

एका कार्यक्रमाला संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, “केंद्र सरकारने शेतकऱ्यांना २ टक्के व्याज द्यायचं कबुल केलेलं होतं, ते बंद केलं. शेतकऱ्याला शून्य टक्के व्याजदराने पैसे मिळू नये. याच उत्तर केंद्र सरकार आणि भाजपवाले देत नाही. हे सगळं सोडून बारामतीला गेले आहेत. तिथे धडका मारून काय होणार आहे का? गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारचं डिपॉझिट जप्त झालं होते,” असा खोचक टोला अजित पवार यांनी मारला आहे.

ओबीसी आरक्षण मिळाल्याचं श्रेय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेतलं जात आहे. यावरून अजित पवारांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “ओबीसी आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारने सर्वकाही प्रयत्न केले, त्यानंतर ते आरक्षण मिळालं. परंतु, ते कावळा उडायला आणि फांदी तुटायला गाठ पडावी, तसे निर्णय झाला तेव्हा हे सरकारमध्ये आले आणि आम्हीच सर्व केलं. काय तुम्ही केलं,” असा सवालही अजित पवारांनी केला आहे.