महाराष्ट्र

माझ्यासमोरच शहांनी ठाकरेंना दिला होता शब्द; खैरेंचा मोठा दावा!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 Sept :- तुम्ही काय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना जमीन दाखवणार? आम्ही तुम्हाला जमीन दाखवू. शिवसेना संपवण्याच्या भ्रमात राहू नका. शिवसेना संपणार नाही. पण, तुम्ही संपाल, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रत्युत्तर दिले.

50-50चा फॉर्म्युल्यावर चंद्रकांत खैरे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात झालेल्या बैठकीत शिवसेना नेता म्हणून मी हजर होतो. या बैठकीत पहिले अडीच वर्ष मुख्यमंत्री पद एका पक्षाला आणि दुसरे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दुसऱ्या पक्षाला मिळणार असे ठरले होते. असे असल्यानंतर जर आता अमित शहा हे उद्धव ठाकरेंना खोटे म्हणत असतील तर ही चीड आणणारी बाब आहे. हे आम्ही सहन करणार नाही. अमित शहा यांच्यासारख्या मोठ्या पदावरील व्यक्तीने असे खोटे बोलणे चुकीचे आहे, असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.

ते म्हणाले की, ठरल्याप्रमाणे न वागता पाचही वर्ष मुख्यमंत्रीपद घेत भाजपने आम्हाला धोका दिला. शिवसेनेला पुर्णपणे दाबण्याचा प्रयत्न केला होता. ते ठाकरे असून यांच्यासारखे पलटणारे नाहीत. भाजपने धोका दिल्याने विकासासाठी मग महाविकास आघाडी स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदुत्वावरुन शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना चंद्रकांत खैरे यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, हिंदुत्व आम्ही कधी सोडले नाही आणि सोडणारही नाही. आता आमची बदनामी करण्याचे काम भाजपचे सर्व नेते करत आहेत. बाळासाहेबांचे बोट पकडून भाजप मोठा झाला. आज गोपिनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे दोघेही नाहीत. 1988 च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकांमध्ये भाजप एकही जागा जिंकू शकला नव्हता. तेव्हा मुंडे आणि महाजन हे बाळासाहेबांकडे आले होते. बाळासाहेबांनी त्यांना साथ दिली. तेव्हा अमित शहा कुठे होते, असा सवाल त्यांनी केला.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान भाजप नेत्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.महाराष्ट्रातले हिंदूविरोधी राजकारण संपवायचे आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, असे ते म्हणाले. तसेच नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मते मागितली आणि जिंकून आले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला. राजकारणात सगळे काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, असे शहा म्हणाले.