महाराष्ट्र

सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Sept :- मागील दोन महिन्यांमध्ये मुसळधार पडणारा पाऊस सप्टेंबर महिन्यात देखील धुवांधार बॅटींग करणार आहे. शिवाय हा परतीचा मान्सून (Monsoon) देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे यंदाचा परतीचा मॉन्सूनही जोरदार बरसण्याची शक्यता आहे.

या वर्षातील मान्सूनच्या हंगामाच्या अखेरच्या महिन्यात देशभरात 109 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून वायव्य भारतातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असल्याची देखील शक्यता वर्तविण्यात आलेय. सप्टेंबरमधील पावसाचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी जाहीर केला.

1971 ते 2020 या कालावधीमधील मॉन्सून पावसाची आकडेवारी पाहता, सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी 167.9 मि.मी. पाऊस पडतो. सरासरीच्या 96 ते 104 पाऊस सर्वसाधारण मानला जातो. सप्टेंबर महिन्यात राज्यात पडणाऱ्या पावसाचा (Rain) अंदाज घेता राज्याच्या सर्वच भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून यामध्ये कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागात जास्तीचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होतय.

पुणे शहर (Pune) व परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ आणि एक-दोन जोरदार सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उद्या शुक्रवारी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. सकाळपासून निरभ्र आकाशामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढेल.

मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हिमालयाच्या पायथ्याकडे गेलेला मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणकडे आला असून, अमृतसरपासून बरेली, वाराणसी, पाटना ते आसामपर्यंत विस्तारला आहे. तर उत्तर तमिळनाडू आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण श्रीलंकेपासून, तमिळनाडू, कर्नाटक, मराठवाडा ते मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामानासह विजांसह पावसाने हजेरी लावलेय.