महाराष्ट्र

काँग्रेसला खिंडार पडणार? अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीसांमध्ये गुफ्तगू

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Sept :- आता शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसला खिंडार पडण्याची जोरदार शक्यता वर्तवली जातेय. काँग्रेसचा एक गट भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या साऱ्या शंका-कुशंकांमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे समोर आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे 2 माजी मंत्री शपथ घेऊ शकतात. यातील एक जण राज्याचा मुख्यमंंत्री राहिलेला आहे. तर, एक जण माजी मंत्री आहे. तसेच, मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान काँग्रेसचे काही आमदारही पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल पुण्यात भेट झाली. भाजप समन्वयक आशिष कुलकर्णी यांच्या घरी या दोन नेत्यांची भेट झाली. दोघांमध्ये जवळपास 20 ते 30 मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. चर्चेचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळवण्याची शक्यता असलेला काँग्रेसचा तो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेच आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दुसरा माजी मंत्री हे चंद्रकांत हंडोरे असल्याची चर्चा आहे. दरम्यान, फडणवीसांशी भेट झाल्याची कबुली अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मात्र, केवळ गणेशोत्सवानिमित्त ही भेट झाली. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे चव्हाण यांनी सांगितले आहे.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी भाजपला मतदान केले होते. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. या आमदारांची यादी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींकडे देत या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या यादीत अशोक चव्हाण यांचेही नाव असल्याची चर्चा आहे. तसेच, शिंदे सरकारच्या बहुमताच्या चाचणीवेळीही काँग्रेसचे 10 आमदार सभागृहात गैरहजर होते.

गैरहजर आमदारांमध्येही अशोक चव्हाण हेच अग्रभागी होते. गैरहजेरीबाबत अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरणही दिले होते. चव्हाण म्हणाले होते की, ‘विधिमंडळातील दालनात आमदारांसोबत चर्चा करताना वेळ गेला. त्यामुळे सभागृहात पोहोचण्यास उशीर झाला.’ मात्र, त्यांच्या या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच, अशोक चव्हाण हे काँग्रेसमधील बंडखोरांचे नेतृत्व करत आहेत का, असाही प्रश्न विचारला जात आहे.

भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गणेशोत्सवातच पालकमंत्री पदाची घोषणा होईल, असे म्हटले आहे. मुनगंटीवार यांनी सांगितले, राज्याचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. या विस्तारात शिंदे गट व भाजपच्या एकूण 23 मंत्र्यांना स्थान दिले जाईल. तसेच, या गणेशोत्सवातच राज्यातील पालकमंत्री पदांची घोषणा करण्यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात व पालकमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.