देश विदेश

स्फोटांनी हादरली मशीद! तालिबानी मौलवी मुल्ला मुजीब अन्सारीचा खात्मा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Sept :- अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मोठा स्फोट झाला. यामध्ये तालिबानचा सर्वात मोठा धार्मिक नेता मुल्ला मुजीब उर रहमान अन्सारी मारला गेला आहे. ही घटना गाजारघ शहरात घडली. गेल्या महिन्यातही तालिबानचा एक प्रमुख नेता मारला गेला होता. या हल्ल्यामागे इसिसच्या खोरासान गटाचा हात असल्याचे मानले जात आहे. याबाबत तालिबानने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गाजारघच्या मशिदीमध्ये एकूण 2 स्फोट झाले. यावेळी जुम्माची नमाज चालू होती. मुल्ला मुजीब हे या मशिदीचे मुख्य इमाम होते. त्याच्या समोरील रांगेत हा स्फोट झाला. हा फिदाईन हल्ला होता आणि त्यात दोन लोक सामील असल्याचे मानले जात आहे. लोक बाहेर पळत असताना दुसरा स्फोट झाला. काही वृत्तांनुसार, मुल्ला मुजीब हेरातमधील आर्थिक परिषदेत सहभागी झाल्यानंतर काही तासांनंतर मशिदीत पोहोचला होता. अन्सारींच्या सचिवाने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.

मुजीब हा तालिबानच्या सर्वात क्रूर नेत्यांपैकी एक मानला जात असे. मुलींच्या शिक्षणाला आणि घर सोडून जाण्यास त्याचा तीव्र विरोध होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्याने फतवा काढला होता. त्यात म्हटले होते की- जर कोणी तालिबान राजवटीला विरोध केला किंवा आदेशांचे पालन केले नाही, तर त्याचा शिरच्छेद करणे हीच त्याची शिक्षा आहे. विशेष म्हणजे हा हुकूम किंवा फतवा तालिबानच्या प्रवक्त्याने मुजीबचे वैयक्तिक मत म्हणून फेटाळून लावला होता.