महाराष्ट्र

शिवसेनेचा दसरा मेळावा संकटात?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 Aug :- शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे आता शिवतीर्थ अर्थात दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेला अद्याप शिवतीर्थावर परवानगी मिळालेली नाही. मुंबई पालिकेनंच शिवसेनेला परवानगी देण्याचा निर्णय राखून ठेवला असल्याचे समोर आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेनं मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. मात्र, शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे दसरा मेळावा कोण घेणार याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबतचा निर्णय मुंबई महापालिकेकडून प्रलंबित ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेनं दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्क येथील परवानगीकरता दोनदा पत्र देऊनही पालिकेनं अर्ज अनिर्णित ठेवला आहे.

गणेशोत्सव आटोपल्यानंतरच दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत निर्णय घेऊ असं महापालिका सहाय्यक आयुक्तांचे स्पष्टीकरण दिले आहे. तसंच, सध्या सर्व स्टाफ गणेशोत्सवाकरता आवश्यक प्रशासनिक बाबी आणि तयारीत गुंतल्यामुळे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.