राजकारणमहाराष्ट्र

संजय राऊत ईडीच्या ताब्यात

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प

दि. 31जुलै :- तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना घेऊन ईडीचे अधिकारी फोर्ट येथील ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. तेथेच त्यांची पुढील चौकशी होणार आहे.

पत्राचाळ प्रकरणात 1034 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांच्यावर आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक सकाळी 7.30 वाजता राऊत यांच्या घरी धडकले होते. पथकात 10 ते 12 अधिकारी असून त्यापैकी सात अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या घराची झाडाझडती घेतली.

ईडीच्या कारवाईबाबत संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी सांगितले, पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील एकही कागद ईडीला मिळालेला नाही. पुढील चौकशीसाठी ईडी कार्यालयात येण्याचे आम्हास सांगण्यात आले आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या घरासमोर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहेत. भाजप व ईडीविरोधात शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. पोलिसांचाही मोठा फौजफाटा राऊत यांच्या घरासमोर तैनात करण्यात आला आहे.

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत आहे. पथकाने संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट सील केला आहे. हा फ्लॅट राऊत यांनी 83 लाख रुपयांना खरेदी केला होता. हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते.

संजय राऊत म्हणाले की, तरीही शिवसेना सोडणार नाही, महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. खोटी कारवाई. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन असे टविट खासदार संजय राऊत यांनी केले आहे.