महाराष्ट्र

राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संताप!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 July :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोश्यारी यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी माफी मागावी तसेच त्यांना पदावरुन दूर करावे, अशी मागणी केली जात आहे. असे असताना महाराट्रातील अनेक राजकीय दिगज्जांनी संताप व्यक्त करत आपली नाराजी जाहीर केली आहे.

संभाजी छत्रपती यांचा आक्षेप
संभाजी छत्रपती यांनीदेखील कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे तसेच या पदावर महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. “विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो किंवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत. त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालावे. तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा आणि त्याबद्दल आदर असणारी एखादी सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राची राज्यपाल म्हणून नियुक्ती करावी,” अशी मागणी संभाजी छत्रपती यांनी केली आहे.

राज ठाकरेंचे खरमरीत पत्र
‘आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो. जय महाराष्ट्र !

उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतात. राज्यपाल हे मानाचे पद आहे. त्यांनी खुर्चीचा मान ठेवावा. गेल्या तीन वर्षापासून ज्या महाराष्ट्राचे मीठ त्यांनी खाल्ले. त्या मिठासोबत त्यांनी नमकहरामी केली आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. ही सगळी संस्कृती त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून पाहिली असेल. आता त्यांना कोल्हापुरातील वाहना दाखवण्याची गरज आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली.

दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे वक्तव्य केलं ते राज्याचा अपमान करणारं वक्तव्य आहे. राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांच्याबाबत केंद्र सरकारकडे तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार असतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी विधानं पुन्हा होऊ नये म्हणून केंद्र सरकारला पत्र पाठवतील. केंद्र सरकार राज्यपालांना अशी विधानं न करण्याबाबत सांगतील.”

शरद पवारांची प्रतिक्रिया
कोश्यारी यांना राज्यपालपदावरून दूर करावे तसेच त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. असे असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारी यांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंत:करण यात काहीही फरक नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.

चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
भाजापाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कोश्यारी यांच्या वक्त्व्यावर आपली भूमिका मांडली आहे.
“मुंबईमध्ये राहणारा प्रत्येकजण मुंबईकर आहे. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण महाराष्ट्रीयन आहे. अशा अनुषंगाने आपण राज्यपालांच्या वक्तव्याकडे पाहिले पाहिजे. विरोधकांकडे बोलण्यासाठी दुसर विषय राहिलेला नाही. त्यामुळे अशा मुद्द्यांवर ते बोलत आहेत. २७ सेकंदांमध्ये ७० शिव्या देणारे सर्वज्ञानी कोणाला दिसत नाहीत. त्यांच्यावर बोलण्यासाठी कोणाची जीभ रेटत नाही. पण राज्यपाल जे बोलले त्याचा कसा विपर्यास करायचा यावर सगळ्याची जीभ रेटते हे बघायला मिळत आहे,” असे चित्रा वाघ टीव्ही ९ मराठीला बोलताना म्हणाल्या. “राज्यपालांनी केलेले वक्तव्य वेगळ्या पद्धतीचे आहे. मात्र मुंबईमध्ये राहणारा प्रत्येकजण हा मुंबईकर आहे. आम्ही मुंबईमध्ये वाढलो आहोत. मुंबई, महाराष्ट्राला घडवण्यात सगळ्यांचा समावेश आहे. सर्वांचेच योगदान आहे, अशी भूमिका राज्यपालांनी मांडली. प्रत्येक पक्षात गुप्ता, वर्मा, शर्मा आहेतच. त्यामुळे सर्वजण मराठी म्हणूनच वावरतात,” असेही चित्रा वाघ म्हणाल्या.