महाराष्ट्र

अमित ठाकरेंच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ! म्हणाले, मंत्रिमंडळात काम करायला…..

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 July :- राज्यात शिंदे-फडणवीस सरकार विराजमान करण्यात मनसेने महत्वाची भूमिका बजावल्याने, मनसेचा एक आमदार असला तरी त्यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता “मला राज साहेबांच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल” असे वक्तव्य मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आज (शनिवार) कल्याणमध्ये केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, चर्चांना उधाण आलं आहे.

कालपासून मनसेमधील नेते अगोदर अंबरनाथमध्ये आणि आज कल्याणमध्ये सरकारमधील मंत्रिपदाबाबत उलटसुलट विधाने करत असल्याने नक्की मनसेची सरकार मधील सहभागा विषयी भूमिका काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. युवा नेते अमित ठाकरे शनिवारी कल्याणमध्ये दाखल झाले. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना शिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील होणार का? असा प्रश्न केला. त्या प्रश्नाला बगल देत अमित यांनी “मला राज साहेबांच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल”असे मिश्कील शब्दात सांगत मनसेला शिंदे सरकारमध्ये स्थान मिळेल असे अप्रत्यक्ष सूचित केले.

अमित यांनी अंबरनाथ दौऱ्यात मनसेला गृहमंत्रीपद मिळणार असेल तर या सरकारमध्ये सहभागी होऊ असे वक्तव्य केले होते. तोच धागा पकडून अमित यांनी कल्याणमध्ये सरकारमधील सहभागा बद्दल हसत हसत भाष्य केल्याने त्यांच्या या विधानाला विशेष महत्व आले आहे.

येत्या दोन दिवसात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांचे नाव मंत्रीमंडळ सहभागाबद्दल घेतले जात आहे. शहरी चेहऱ्या पेक्षा बहुजन समाजाला आकर्षित करण्यासाठी हा चेहरा शिवसेना-भाजपाला निवडणूक काळात मोलाची मदत करणारा असल्याने आमदार पाटील यांचे नाव मंत्रिपदासाठी घेतले जात आहे. त्याच अनुषंगाने अमित यांची कल्याण, डोंबिवलीतील वक्तव्ये महत्वाची मानली जात आहेत.