मराठवाडा

संभाजीनगर होणारच; फडणवीसांनी केलं स्पष्ट!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 July :- औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? असा खोचक सवाल करत शिंदे-भाजपा सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. असे असताना उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे होणारच, नामांतराला स्थगिती दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

“नियम आणि परंपरा अशी आहे की ज्या वेळी राज्यपाल विश्वासदर्शक ठराव ठेवा म्हणून पत्र देतात, तेव्हा कुठलाही महत्त्वाचा निर्णय मंत्रीमंडळाने घ्यायचा नसतो. पूर्वी अनेक वेळा राज्यपाल बहुमत सिद्ध करण्यास सांगायचे. मात्र बैठक बोलवून मंत्रीमंडळ बरखास्तीचे निर्णय घेतले जायचे. त्यामुळे बहुमत सिद्ध करा, असे पत्र गेल्यानंतर कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे, असे कोर्टाने वेळोवळी सांगितलेले आहे. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव किंवा नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देणे या मागण्यांना मागील सरकारने अडीच वर्षात हात लावला नाही. मात्र बहुमत गमावल्यानंतर बैठक बोलवून निर्णय घेतले. हे संकेतांना धरून नाही,” असे फडणीस यांनी सांगितले.

तसेच, “ही नावं द्यायची आहेत. आमचा अजेंडा हाच आहे. त्यामुळे ज्या सरकारकडे बहुमत आहे, त्याच सरकारचं मंत्रीमंडळ त्याला मान्यता देईल. म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही नावं आमच्या अस्मितेची आहेत, महत्त्वाची आहेत. त्यामुळे अवैध बैठकीत ती देण्यता येऊ नयेत. बहुमत असलेल्या सरकारसमोर ती ठेवण्यात यावीत. आमच्या पुढच्या मंत्रीमंडळ बैठकीत ती समोर ठेवण्यात येतील, असे आयुक्तांना सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे हे तिन्ही निर्णय आमचे सरकार घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

“महाविकास आघाडीला सरकारमध्ये बहुमत नव्हतं. पण मंत्रीमंडळ बैठकीतही त्यांना बहुमत नव्हतं. त्यामुळे नेमका कोणाचा निर्णय काय होता? हे समजू शकलेले नाही. आजही काही लोक दुटप्पी बोलत आहेत,” असा टोला लगावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय ठाम आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.