शिंदे-फडणवीस सरकारचा नवा निर्णय; नागरिकांमध्ये संतापाची लाट
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
15 July :- तत्कालीन मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या संभाजीनगरच्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. मात्र त्यांच्या या निर्णयाविरोधात तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. संभाजीनगर निर्णयानंतर जल्लोष करण्यात आलेल्या औरंगाबाद शहरात शिंदेंच्या या निर्णयाने नाराजी पसरली असून संभाजीनगरच्या समर्थनात पुन्हा एकदा लढा उभारण्याचे संकेत नागरिकांनी दिले आहेत.
औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत स्थगिती दिली. यासोबतच ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना नव्या सरकारने रोखण्याचे आदेश दिले आहेत. संजय राऊतांनीही एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसात मोठ्या उलथापालथी झाल्या. शिवसेनेच्या निष्ठावंत असलेल्या एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारले. आणि नाट्यमय घडामोडी घडत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मात्र याआधीच एकनाथ शिंदे हे भाजपबरोबर सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले.
यात वादग्रस्त आणि गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला औरंगाबादच्या नामांतराबाबतही निर्णय घेण्यात आला. याच मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करण्यात आले. या सर्व निर्णयांना शिंदे यांनी स्थगिती दिली आहे.