महाराष्ट्रराजकारण

अजित पवारांचा ताफा अडवला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प

दि.15 जुलै :- राजकारणात कोणी कोणाच नसतं, तसेच कोण कधी कोणासोबत जाईल हे सांगता येत नाही. आज अहमदनगरमध्ये हे चित्र दिसले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत ज्यांचे धोतर फेडण्याची भाषा अजित पवारांनी केली, त्याच नेत्याच्या प्रचारासाठी पवार आज नगरमध्ये आले. मात्र, यावेळी संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पवारांचाच ताफा अडवला व या बदलेल्या भूमिकेचा जाब विचारला.

अहमदनगर हा भाजप नेते मधुकर पिचड यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी अकोले मतदार संघातून विजय मिळवला. मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांचा लहामटे यांनी पराभव केला. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मधुकर पिचड यांच्या अत्यंत जवळचे समजले जाणाऱ्या सीताराम गायकर यांच्यावर अजित पवारांनी टीकेची झोड उठवली होती. यावेळी अजित पवार म्हणाले होते, निवडणुकीत गायकर यांना धोतर फेडायला लावेल. आता हेच गायकर अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उभे आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी अजित पवार अकोले येथे आले आहेत.

गायकर यांच्या प्रचारसभेसाठी अजित पवार जात असतानाच शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा उडवला. शेतकरी नेते दशरथ सावंत यांना अजित पवारांची भेट घ्यायची होती. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना हटकले. दशरथ सावंतांसह काही आंदोलकांना ताब्यातही घेतले. त्यामुळे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न अजित पवारांनी करुन पाहिला. मात्र, आम्ही डॉ. किरम लहामटे यांना निवडून दिले आहे. तुम्ही गायकरांचा प्रचार कसा काय करू शकतात, असा सवाल आंदोलकांनी केला.

2019मध्ये ज्यांचे तुम्ही धोतर फेडणार होता, त्यांचा आज प्रचार कसा काय करता, असा सवाल शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी केला आहे. तसेच, प्रचारसभेच्या स्टेजवर जाऊनही आपण अजित पवारांना हा प्रश्न विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आजच्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दशरथ सावंतांसह काही आंदोलक अजूनही पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजते.