काँग्रेसमध्ये गृहकलह! 9 आमदारांना नोटीस…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
8 July :- काँग्रेसमधील धुसफुसीच्या अनेक चर्चा रंगलेल्या असतात. या चर्चांची दखल आता काँग्रेस हायकमांडकडून घेतली जात असल्याचं चित्र आहे. यावेळी निमित्त थोडसं वेगळं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी काँग्रेसचे तब्बल 11 आमदार अनुपस्थित होते. यापैकी 9 आमदारांना पक्षाने नोटीस बजावली आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे. या संपूर्ण प्रकारची चौकशी करण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोहन प्रकाश यांची नियुक्ती केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसच्या अनेक आमदारांच्या अनुपस्थितीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केलेली. तसेच त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईची मागणी केली होती.
गेल्या महिन्यात 20 जूनला विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत काँग्रेसच्या दोन उमेदवारांपैकी एकाचा पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांचा विजय झाला. तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांची मते फुटल्याची बातमी समोर आली होती. या घटनेप्रकरणी देखील पक्षात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.