देश विदेश

जपानचे माजी पंतप्रधानांची हत्या; भरसभेत माजी सैनिकाने घातल्या गोळ्या

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 July :- जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची शुक्रवारी सकाळी हत्या करण्यात आली. ते नारा शहरातील एका प्रचारसभेला संबोधित करत होते. त्यावेळी 42 वर्षीय हल्लेखोराने त्यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला. त्यात ते जबर जखमी झाले. पोलिसांनी आरोपीच्या घटनास्थळीच मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, आरोपीचे नाव यामागामी तेत्सुया असून, तो आबेंच्या धोरणांवर नाराज होता.

शिंजो आबे 2 गोळ्या लागल्यानंतर जमिनीवर कोसळले. त्यानंतर तत्काळ त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने नारा मेडिकल यूनिव्हर्सिटी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे सलग 6 तास त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 8 च्या सुमारास (जपानच्या प्रमाणवेळेनुसार सकाळी 11.30) ही घटना घडली.

आबेंवर गोळीबार झाला त्यावेळी ते एका प्रचारसभेल संबोधित करत होते. त्यावेळी गोळाबाराचा आवाज झाला व आबे जमिनीवर कोसळले. स्थानिक माध्यमांनी त्यांच्या छातीत गोळ्या घालण्यात आल्याचा दावा केला. पण नंतर त्यांच्यावर पाठीमागून गोळीबार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आबे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. ते एका ट्विटमध्ये म्हणाले -‘भारत व जपानचे संबंध व जागतिक भागीदारीत आबेंची महत्वाची भूमिका होती. आज संपूर्ण भारत शोकमग्न आहे. या कठीण स्थितीत आम्ही पूर्ण ताकदीने आपल्या जपानी बंधू-भगिनींसोबत उभे आहोत.’ मोदींनी आबेंच्या सन्मानार्थ 9 जुलै रोजी राष्ट्रीय दुखवटा पाळण्याची घोषणाही केली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून यामागामी तेत्सुया नामक 42 वर्षीय हल्लेखोराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक बंदूकही जप्त करण्यात आली आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याने आबेंवर का गोळीबार केला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण तो आबेंच्या धोरणांवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

जपानी माध्यमांनुसार, गोळी लागल्यानंतर शिंजो आबेंना हृदयविकाराचा झटकाही आला. पण, याविषयी अद्याप अधिकृत निवेदन आले नाही. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, घटनास्थळी गोळीबार झाल्यानंतर आबेंच्या शरीरातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. जपानमध्ये रविवारी वरिष्ठ सभागृहाची निवडणूक होणार आहे. शिंजो आबे या निवडणुकीसाठी प्रचार करत होते.