HDFC बँकेचा ग्राहकांना झटका
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
7 July :- सर्वसामान्य नागरिक महागाईने पुरते मेटाकुटीस आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असताना आता ईएमआयचा हप्ता वाढून लोकांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. आरबीआयने नुकतीच रेपो दरात वाढ केली होती. त्यानंतर खासगी बँकांकडून सर्व प्रकारच्या कर्जावरच्या व्याजदरात वाढ झाल्याने ग्राहकांना अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.
खासगी क्षेत्रातल्या एचडीएफसी बँकेने तर वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जांसाठीच्या एमसीएलआर दरांमध्ये 20 बेसिस पॉइंट्सने म्हणजेच 0.20 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि कार कर्जाच्या व्याजदरात वाढ होणार आहे. याचाच अर्थ, ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. एचडीएफसी बँकेने 7 जुलै 2022 पासून नवीन व्याजदर लागू केले आहेत. त्याबद्दलचं वृत्त ‘टीव्ही नाइन हिंदी’ने दिलं आहे.
वाढलेल्या व्याजदरांबाबतची माहिती एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. यात म्हटल्याप्रमाणे, बहुतांश ग्राहक जोडल्या गेलेल्या एमसीएलआरच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने एका रात्रीचा कालावधी असलेल्या एमसीएलआरचा व्याजदर 7.50 टक्क्यांवरून 7.70 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
एक महिन्याचा कालावधी असलेल्या एमसीएलआरचे दर 7.75 टक्के करण्यात आले आहेतच. 3 महिने कालावधी असलेल्या एमसीएलआरचे नवे दर 7.80 आणि 6 महिने कालावधीसाठीचे दर 7.90 टक्के करण्यात आले आहेत. याशिवाय एक वर्ष कालावधीसाठी एमसीएलआर दर 8.05 टक्के करण्यात आला आहे.