शिवसेनेला खिंडार… महाराष्ट्रात राजकीय भूकंप
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
दि. 21 जून :- महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार संकटात आहे. त्यांचे दिग्गज मंत्री एकनाथ शिंदे गुजरातमधील सुरत येथे 15 शिवसेना, एक राष्ट्रवादी आणि 14 अपक्ष आमदारांसह गेले आहेत. शिंदे यांच्याशिवाय या गटात आणखी 3 मंत्री असून एकूण 30 आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची युती तोडून भाजपसोबत युती करण्याची अट ठेवल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रिपदावर बसायचे असल्याचेही बोलले जात आहे. शिंदे यांनी संजय राठोड, संजय बांगर आणि दादा भुसे या तीन आमदारांनाही मातोश्रीवर पाठवले आहे. या बैठकीत काय झाले हे अद्याप समजू शकलेले नाही.
सुरतमध्ये उपस्थित असलेल्या आमदारांबाबत दोन शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. प्रथम- त्यांना विमानाने दिल्लीला नेले जाऊ शकते आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नेले जाऊ शकते. दुसरे- त्यांना अहमदाबादमधील कोणत्याही रिसॉर्टमध्ये नेले जाऊ शकते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सुरतला पाठवले आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार रवी पाठक हेही सुरत येथील ली-मेरीडीन्स या हॉटेलमध्ये आहेत. त्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. सुमारे वीस ते तीस मिनिटे ही चर्चा झाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यांशी संजय राठोड, संजय बांगर आणि दादा भुसे यांनी संपर्क साधला. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी प्रमुख मागणी एकनाथ शिंदे यांची आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असावेत, तर उपमुख्यमंत्री आपली वर्णी लागावी, अशी मागणीही शिंदे यांनी केल्याचे समजते.
नाराज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये 30 हून अधिक आमदार असल्याचे समजते. त्यात बाळापूर (अकोला) येथील आमदार नितीन देशमुख आहेत. देशमुख आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते. सूरतला आल्यामुळे देशमुख नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांचे शिंदे यांच्यासोबत खटके उडाले. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. देशमुख यांना सध्या सूरत येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, तिथेही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांना हॉटेलमधून बाहेर जायचे होते. यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले. त्यामुळे त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर ते हॉटेलच्या बाहेर येऊन बसले. मात्र, वाहन नसल्याने ते पंधरा मिनिटे तिथेच बसून राहिले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूरतच्या हॉटेलमध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या नाराज आमदारांना आता अहमदाबादला पाठवण्यात येणार आहे. अहमदाबादमध्ये ते अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान तत्पूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा हे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी नड्डा यांच्या घरी पोहचल्याचे समजते. दुसरीकडे वर्षावर शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक थोड्याच वेळात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.