खरंच पेट्रोल पंप पुढील 3, 4 दिवस बंद राहणार?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
31 May :- ‘पेट्रोल पंप पुढील 3, 4 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे आताच पुरेसे पेट्रोल वाहनात भरुन ठेवा’, असे व्हॉट्सअॅप मॅसेज तुम्हालाही आले असतील, तर त्यावर विश्वास ठेवू नका. कारण हे मॅसेज म्हणजे निव्वळ अफवा आहेत, असे पेट्रेलियम डिलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले आहे.
पेट्रोल-डिझेलचा कंपन्यांकडून अनियमित पुरवठा होत असल्यामुळे त्याचा निषेध म्हणून डिलर्सनी केवळ एक दिवस इंधन खरेदी बंद ठेवली आहे. याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. सर्व ठिकाणी पेट्रोल पुरवठा सुरळीत होत आहे आणि राहिल, असे अब्बास यांनी स्पष्ट केले.
31 मेरोजी पेट्रोल पंप चालकांच्या आंदोलानमुळे पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल, या भीतीने तसेच सोशल मिडियावरील पेट्रोल पंप बंदच्या अफवेमुळे राज्यभरात शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे 30 मेरोजीच वाहनचालकांनी आपल्या वाहनाची पेट्रोलची टाकी फुल करण्यास सुरुवात केली. जे ग्राहक ऐरवी 1 लिटर पेट्रोल खरेदी करतात, त्यांनी काल 5 लिटर पेट्रोल खरेदी केले. त्यामुळे औरंगाबाद शहरातील काही पेट्रोल पंप बंद झाले, अशी माहिती औरंगाबादेतील जागृती पेट्रोलियमचे व्यवस्थापक सतीश बांगड यांनी दिली.
हे बंद पेट्रोल पंप पाहून नागरिकांमध्ये धास्ती आणखी वाढली आणि त्यांनी अधिकचे पेट्रोल वाहनात भरून घेतले, असेही बांगड म्हणाले. मुळात पेट्रोल पंप चालकांकडे 2, 3 दिवसांचा स्टॉक असतो. त्यामुळे वाहनचालकांनी नेहमी प्रमाणेच पेट्रोल-डिझेल भरले असते, तर काही ठिकाणीदेखील समस्या निर्माण झाली नसती, असेही बांगड यांनी सांगितले.
आज शहरांमधील पेट्रोल पंप नियमित सुरु असले तरी गंगापूर, वैजापूरसारख्या ठिकाणी पेट्रोल पंप बंद आहेत. त्यामुळे तेथील वाहनचालकांचे हाल होत आहेत. याबाबत पेट्रेलियम डिलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी सांगितले की, या ठिकाणी समस्या पुरवठ्याची आहे. पेट्रोल-डिझेल कंपन्या पंप चालकांकडून आगाऊ पैसे घेतात. मात्र वेळेवर इंधनाचा पुरवठा करत नाही. अशा स्थितीत गाव, तालुक्याच्या पंच चालकांना तग धरून ठेवणे कठीण जाते. कारण त्यांच्याकडे शहरातील पंपांसारखा अतिरिक्त साठा जास्त नसतो. त्यामुळे पुरवठा बंद होताच त्यांना पेट्रोल पंप बंद करावा लागतो. पेट्रोल पंपांच्या आंदोलनामुळे नव्हे तर कंपन्यांनी पुरवठा न केल्यामुळे गाव, तालुक्यातील पेट्रोल पंप बंद आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
शहरांमध्ये ज्या ठिकाणी पेट्रोलच्या तुटवड्यामुळे पंप बंद झाले आहेत, ते उद्या दुपारपर्यंत सुरु होतील, अशी माहिती राज पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक युसुफभाई यांनी दिली. अफवेमुळे काल आपल्या पंपावर प्रचंड गर्दी झाली होती. आम्ही केवळ एक दिवस इंधन खरेदी बंदचा निर्णय घेतला होता. उद्यासाठी आम्ही पेट्रोल-डिझेलच्या ऑर्डर दिल्या आहेत. त्यामुळे उद्या शहरांत कुठेही तुटवडा जाणवणार नाही, असे ते म्हणाले.