भारत

‘या’ राज्यावर होणार चक्रीवादळाचा परिणाम; हायअलर्ट जारी!

10 मे :- भारतीय हवामान विभागाने (IMD) असनी चक्रीवादळाबाबत सर्तकतेचा इशा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचं आता तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. असानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांचे हवामान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सक्रियपणे काम करत आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, किनारपट्टीजवळ आल्यानंतर असनी चक्रीवादळ पुन्हा उत्तर-ईशान्य दिशेने वळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

असनी चक्रीवादळ पूर्व किनार्‍याच्या दिशेने हे वादळ पुढे जात असून, त्यामुळे बाधित भागात ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत असून काही भागात पाऊसही पडताना दिसत आहे. सोमवारी असानी चक्रीवादळ विशाखापट्टणमपासून 550 किमी दक्षिण-पूर्व, पुरीच्या दक्षिणेला 680 किमीवर होते. ते आता 100 ते 110 किमी प्रतितास वेगवान वाऱ्यांसह उत्तर-पश्चिम दिशेनं सरकत आहे.

चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह लगतच्या किनारी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत मच्छीमारांनी पुढील किमान दोन दिवस या भागात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.ओडिशा सरकारने चार किनारी जिल्ह्यांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची योजना आखली आहे. ओडिशाच्या सर्व बंदरांवर चेतावणी दर्शवणारी चिन्हे लावण्यात आली आहेत. हे चक्रीवादळ ओडिशा किंवा आंध्र प्रदेशात धडकणार नाही, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ते पूर्व किनाऱ्याला समांतर धावेल आणि पाऊस पडेल.