बीड

IPL 2022 : कमिन्स पुन्हा पडला मुंबईवर भारी, बुमराहचं रेकॉर्ड पाण्यात, KKR चा दणदणीत विजय

नवी मुंबई, 9 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) पॅट कमिन्स (Pat Cummins) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सवर (MI vs KKR) भारी पडला आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा 52 रननी पराभव झाला आहे. केकेआरने दिलेल्या 166 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा 17.3 ओव्हरमध्ये 113 रनवर ऑल आऊट झाला. पॅट कमिन्सच्या 14 व्या ओव्हरमध्ये मुंबईने अर्धशतक झालेला इशान किशन (Ishan Kishan), डॅनियल सॅम्स आणि मुरुगन अश्विन या 3 विकेट गमावल्या. या सामन्यात मुंबईचे तब्बल 3 रन आऊट झाले.

केकेआरकडून कमिन्सच्या 3 विकेटशिवाय रसेलला 2 आणि टीम साऊदीला 1 विकेट घेण्यात यश आलं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात कमिन्स दुसऱ्यांदा मुंबईसाठी व्हिलन ठरला. याआधी झालेल्या मॅचमध्ये कमिन्सने डॅनियल सॅम्सच्या एका ओव्हरमध्ये 35 रन ठोकले होते.

या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर मुंबईने केकेआरला 165/9 वर रोखलं. पहिल्या 10 ओव्हरमध्येच केकेआरचा स्कोअर 100 च्या पुढे होता, त्यामुळे ते 200 चा टप्पा गाठणार असं वाटत होतं, पण बुमराहच्या भेदक बॉलिंगपुढे केकेआरने गुडघे टेकले. बुमराहने 4 ओव्हरमध्ये फक्त 10 रन देऊन 5 विकेट घेतल्या. बुमराहची आयपीएलमधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

मुंबईविरुद्धच्या या विजयामुळे केकेआरचं प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं आव्हान अजूनही कायम आहे. नवव्या क्रमांकावर असलेली केकेआर या विजयासह थेट सातव्या क्रमांकावर गेली आहे. केकेआरने 12 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्स शेवटच्या क्रमांकावर कायम आहे. मुंबईने 11 पैकी 9 मॅच हरल्या आहेत तर फक्त 2 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आहे.