भारत

माफीशिवाय राज ठाकरेंना प्रवेश नाहीच

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 May :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन भाजप आणि मनसेत वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी माफीशिवाय राज ठाकरे यांना प्रवेश नाही, अशी भूमिका घेतलीय. त्यानंतर मनसे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी थेट बृजभूषण शरण सिंह यांनाच फोन केला. त्यावेळी त्यांच्यात शाब्दीक चकमक झडून वाद उफाळला.

मनसैनिक तुलसी जोशी यांनी उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांना काॅल करून राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध न करण्याचे आवाहन केले होते. त्यावर दोघांतील टोलेबाजीही व्हायरल क्लिपवरून स्पष्ट झाली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना यापूर्वीही इशारा देण्यात आला आहे. राज यांना आम्ही अयोध्येत येऊ देणार नाही. त्यांनी आधी हात जोडून सर्व उत्तर भारतीयांची माफी मागावी. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊ नये, असे आवाहनही खासदार बृजभूषण यांनी केले आहे. तर दुसरीकडे राज 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत म्हणून मनसेकडून मुंबईत ‘अयोध्या चलो’चे पोस्टर लावण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध मनसे वाद उफाळण्याची शक्यता आहे. याचा प्रत्यय या ऑडिओ क्लिपवरुन दिसून येत आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या खासदारालाच थेट फोन करत मनसे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी त्यांना टोले लगावले.