महाराष्ट्र

‘या’ कारणामुळे मनसेची 3 मे ची महाआरती रद्द

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 May :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 3 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज्यभरात महाआरतीचे आयोजन करण्यात येणार होते. परंतु ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर तणाव येऊ नये म्हणून आता 3 मेऐवजी 4 मे रोजी राज्यभरात महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र तथा मनसे नेते अमित ठाकरे दादर मधील प्रभादेवी मंदिरात महाआरती करतील. तसेच राज्यभर विभागानुसार महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबाद मधील सभा चांगलीच वादळी ठरली. अपेक्षेप्रमाणे राज यांनी पुन्हा एकदा भोंग्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले. 4 मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवतील असा अल्टीमेटम राज ठाकरे यांनी दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई ठाणे आणि नंतर औरंगाबाद मध्ये सभा घेत आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज ठाकरे असा कलगीतुरा पाहायला मिळत आहे.

महाविकासआघाडी मधील सर्वच नेते मंडळी राज यांच्या भाषणावर टीका करत आहे. राज ठाकरे यांनी देखील शरद पवार यांच्यावर निशाणा साधत शरद पवार यांना ‘हिंदुत्त्व’ या शब्दाचीच अ‍ॅलर्जी असल्याचे म्हटले होते. आता राज ठाकरे पुन्हा एकदा हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला घेरणार असल्याचं दिसून येतंय. मनसेच्या वतीने राज्यभर विभागवार महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांसह आयोध्येला जाणार आहे. या आयोध्या दौऱ्याची देखील राज्यभरात चर्चा आहे. आयोध्या दौऱ्यांच्या माध्यमातून मनसे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उत्तर भारतीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भाजपची युती करायची असेल तर उत्तर भारतीय मतदारांना नाराज करता येणार नाही, त्यामुळेच राज ठाकरे आयोध्या दौऱ्यावर जात असल्याची देखील चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.