योगींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
25 March :- योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपणीयतेची शपथ घेतली. त्यांच्यासोबत केशव प्रसाद मौर्य व ब्रजेश पाठक यांच्यासह एकूण 52 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात मौर्य व पाठक यांची उप मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. नव्या मंत्रिमंडळात 18 कॅबिनेट मंत्री असून, दानिश आझाद हे एकमेव मुस्लिम चेहरा आहेत.
यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी येथील अटल स्टेडियममध्ये आयोजित एका भव्य समारंभात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यांच्यानंतर केशव प्रसाद मौर्य व ब्रजेश पाठक या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. योगी 2.0 मध्ये एकूण 52 मंत्री आहेत. यात 16 कॅबिनेट, 14 स्वतंत्र प्रभार व 20 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
अनेक आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ‘भारत माता की जय’चे नारे दिले. मंत्रिमंडळात सर्वाधिक 18 मंत्री ओबीसीचे आहेत. याशिवाय 10 ठाकूर, 7 दलित, 3 जाट, 3 व्यापारी, 2 पंजाबी व एका मुस्लिम चेहऱ्यालाही मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. सरकारमध्ये दानिश आझाद हे एकमेव मुस्लिम मंत्री आहेत.
योगींच्या नव्या मंत्रिमंडळातून माजी मुख्यमंत्री दिनेश शर्मा, श्रीकांत शर्मा, सतीश महाना, मोहसिन रझा, निळकंठ तिवारी, सिद्धार्थ नाथ सिंह, जय प्रतात सिंह पटेल, आशुतोष टंडन आदी 20 जून्या मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्या जागी बेबी राणी मौर्य, लक्ष्मी नारायण चौधरी सारख्या काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.योगी मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री व देशातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.
शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या अमित शाह, नितीन गडकरी व वसुंधरा राजे यांच्या वाहनांचा ताफा समारंभ स्थळापासून 1 किलोमीटर अंतरावर ट्रॅफिक जाममध्ये अडकला. यामुळे या तिन्ही नेत्यांना पायी चालून शपथविधीचे स्थळ गाठावे लागले. शाह यांनी या प्रकरणी स्थानिक पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह जवळपास 12 राज्यांचे मुख्यमंत्रीही शपथविधी सोहळ्याला हजर होते.