मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी एमआयएमची ऑफर धुडकावली
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
20 March :- येत्या 22 मार्चपासून विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू होत आहे. त्यानिमित्त शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांना शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले.
यावेळी गेल्या काही दिवसांपासून आघाडीत सहभागी होण्याबाबत एमआयएमने दिलेल्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. शिवसेना हिंदुत्ववादी होती आणि राहिल. शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये भेसळ नाही. एमआयएम ही भाजपची ‘बी’ टीम आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत युती कदापीही करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
एमआयएमच्या ऑफरमागे व्यापक कट आहे. शिवसेनेला, शिवसेनेच्या हिंदुत्वाला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. यामागे भाजपच असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, शिवसेनेच्या भगव्याला बदनाम करणाऱ्यांना नेस्तनाबूत करा. शिवसेना अंगार आहे, भाजप भंगार आहे हे दाखवून द्या, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसंपर्क अभियान यशस्वी करुनच या, अशा शुभेच्छा देताना शिवसेनेची ताकद राज्यभर वाढवा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुख व खासदारांना दिले. गेल्या विधानसभा निवडणुकीत जे मतदारसंघ भाजपने जिंकले, त्या ठिकाणी जोरदार तयारी करा. भाजपची जिथे ताकद आहे, तिथे आपली ताकद वाढली पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
तुमच्याकडून आघाडीची ऑफर द्या, असे एमआयएला भाजपनेच आदेश दिले आहेत. औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्यांचा संबंध शिवसेनेशी नव्हे, तर भाजपचाच अशा लोकांशी संबंध आहे. त्यामुळे शिवसंपर्क अभियानात लोकांच्या मनातील सर्व संशय दुर करा, शिवसेनेला बदनाम करण्याचा हा व्यापक कट उधळून लावा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यासोबतच जनतेच्या समस्या, अडचणी समजून घ्या. त्या दुर करण्याचा प्रयत्न करा, असे आदेशही त्यांनी दिले.
राज्यपाल नियुक्त आमदारांची नेमणुक अद्याप रखडल्यावरुन मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल व भाजपवर टीका केली. 12 आमदारांची नियुक्ती प्रलंबित ठेवून राज्यपाल राज्यातील नागरिकांचेच हक्क डावलत आहेत. त्यांची ही भूमिका लोकशाहीविरोधी आहे. मात्र, भाजप त्यावर काहीही बोलायला तयार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, शिवसेना आता बाळासाहेब ठाकरे यांनाही जनाब बाळासाहेब ठाकरे म्हण्ण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर संजय राऊत यांनी त्याला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन करून भाजपने दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांचा अपमान केला आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत सरकार स्थापन करताना त्यांना काही वाटले नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये. जनाब कौन आहेत, हे वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला सांगू.