देश विदेश

नमाजवेळी मशिदीत स्फोट

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 March :- पाकिस्तानच्या पेशावरमध्ये शुक्रवारी नमाजाच्या वेळी झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात 36 भाविकांचा मृत्यू झाला. तर 50 हून अधिक जण जखमी झाले असून त्यापैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पेशावरच्या कोचा रिसालदार भागातील किस्सा ख्वानी मार्केटमधील शिया मशिदीत हा स्फोट झाला.

पेशावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोरांनी शहरातील किस्सा ख्वानी मार्केटमधील मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केला आणि थांबल्यावर तेथे उभ्या असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. यादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी मशिदीत घुसून स्वत:ला उडवले. बचाव पथक जखमींना येथील लेडी रीडिंग रुग्णालयात घेऊन जात आहे.

स्थानिक लोकांनीही जखमींना मोटारसायकल आणि कारमधून रुग्णालयात नेले. पोलीस आणि सुरक्षा पथकांनी परिसराला वेढा घातला आहे. लेडी रीडिंग हॉस्पिटलच्या प्रवक्त्याने सांगितले की, जखमींपैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

हल्ल्यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने पाकिस्तानी माध्यमांना सांगितले की, हल्लेखोरांपैकी एकाने काळे कपडे घातले होते. त्याने मशिदीच्या मुख्य हॉलमध्ये घुसून स्वत:ला उडवले. यानंतर सर्वत्र मृतदेह आणि जखमी लोक पडले होते. हॉल भाविकांनी तुडुंब भरला होता.

मशीद गजबजलेल्या भागात असल्याने बचाव पथकाला येथे पोहोचण्यात अडचणी येत आहेत. यामुळे लोकांनी जखमींना मोटारसायकलने रुग्णालयात नेण्यात आले. या हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे सांगितले आहे. इम्रान यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेचा अहवालही मागवला आहे.