छत्रपतींसमोर सरकार नतमस्तक; सर्व मागण्या मान्य!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
28 Feb :- मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्याने, तसेच सरकारच्या आश्वासनानंतर खासदार संभाजीराजे यांनी अखेर आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. खासदार संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाची हाक दिली होती. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून, आज सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर आपण उपोषण मागे घेत आहोत. असे संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संयोगिता राजे या देखील उपोषणाला सोबत होत्या. त्यांनी देखील आपण उपोषण मागे घेत असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर खासदार संभाजी छत्रपती यांनी आज उपोषण मागे घेतले. तीन दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी उत्तर दिले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या.
राज्यसरकार आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागण्या मान्य केल्या. केवळ मागण्या मान्य केल्या नाही तर त्याचे मिनिट्स आणले. या मागण्या किती दिवसात आणि कसा पद्धतीने पूर्ण करणार याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. असे एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यसरकार इतकी तयारी करेल याची मला अपेक्षा नव्हती. मात्र, सरकारने जी तयारी केली ते पाहून भारावलो आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे हे माहित आहे. पण, जेथे-जेथे माझी गरज बसेल तेथे राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेन मी सुद्धा तुमच्यासोबत आहे. अशी ग्वाही संभाजीराजे यांनी दिली आहे.