कलाविष्कार प्रतिष्ठानचा लोकाभिमुख गौरव सोहळा थाटामाटात संपन्न
20 Jan :- गेल्या अनेक वर्षांपासून गेवराईच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या अभिनव संकल्पनेतून दर्जेदार उपक्रम उभारत गेवराईचा सांस्कृतिक वारसा जपण्याचं उल्लेखनीय कार्य कलाविष्कार प्रतिष्ठान करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बालकलावंताच्या अंगी सुप्त अवस्थेत दडलेल्या कलागुणांना रंगमंच देण्यासाठी नृत्य, नाट्य तसेच व्यक्तिमत्व विकासाचे अनेक शिबीर आयोजित करून कलाविष्कार प्रतिष्ठानने अनेकदा जिल्हा स्तरीय नृत्य स्पर्धेचे देखील यशस्वी आयोजन केलेले आहे.
याबरोबरच गेवराई शहरात अनेक ठिकाणी वृक्षारोपणाबरोबर वृक्षसंवर्धनाचे देखील उपक्रम उभा केली आहेत. आजवर कलाविष्कार प्रतिष्ठानने गेवराई शहरात आपल्या कार्यातून समाजासाठी आदर्श निर्माण करणाऱ्या 16 कर्तृत्वान व्यक्तिमत्वांना गेवराई रत्न आणि गेवराई भूषण पुरस्कार बहाल करून कौतुकाची थाप दिली आहे तर याहीवर्षी 12 जणांना गेवराई रत्न तर एक गेवराई भूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. कलाविष्कार प्रतिष्ठानकडून मायभूमीत गेवराई भूषण आणि गेवराई रत्न हा पुरस्कार मिळालेल्याने पुरस्कार विजेते भारावून गेल्याचे दिसून येत होते.
दि 18 जानेवारी रोजी शहरातील चिंतेश्वर मंदिर येथील सभागृहात राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त, कलाविष्कार प्रतिष्ठानकडून छत्रपती मल्टीस्टेटच्या सौजन्याने गौरव सोहळा व कोरोनाबाबत जनजागृती मार्गदर्शन शिबिराचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून चिंतेश्वर संस्थांनचे महंत दिलीप बाबा घोगे, उद्घाटक माजी राज्यमंत्री बदामराव पंडित तर अप्पर जिल्हाधिकारी प्रसाद चौघुले, तहसीलदार सचिन खाडे, सौ खाडे, छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी, सौ आरती भंडारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कदम, आधार हॉस्पिटलचे डॉक्टर बी आर मोटे, सौ डॉ वर्षा मोटे, सहा.पोलीस निरीक्षक संदीप काळे, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, दै. झुंजार नेताचे उपसंपादक प्रतिक कांबळे यांच्यसह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीस राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वरांजली संगीत क्लासेसच्या बहारदार गीताने आणि बालग्राम परिवाराच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांसाठी बहारदार स्वागतनृत्य सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सहकुटुंब, सहपरिवार एकत्र येऊन कलाविष्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यवाहक दिनकर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी उपक्रम राबवून, विविध क्षेत्रातील सामाजिक घटकांना एकत्रित आणण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कलाविष्कार प्रतिष्ठान हे केवळ सांस्कृतिक व्यासपीठ राहिले नसून ते आता गेवराईकरांसह तालुक्याचा सांस्कृतिक वारसा जपणारा परिवार झाला आहे असे गौरवोद्गार शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केले आहेत.
प्रास्ताविकपर भाषणात कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाहक दिनकर शिंदे म्हणाले की, पती-पत्नी अशा जोडीने सदस्य असलेल्या कलाविष्कार प्रतिष्ठानमध्ये आज 50 सदस्य आहेत. येत्या काळात सकारात्मक विचारांचे सक्रिय 100 कपल हे प्रतिष्ठानचे सदस्य करणार असून, पुढच्या वर्षी स्मरणिकाही प्रकाशित करणार असल्याचे सांगितले. इतरत मान्यवरांनी देखील कलाविष्कार प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पुरस्कार प्राप्त बालग्राम परिवाराचे संतोष गर्जे, प्रा बापू घोक्षे, रंजित पवार, राहुल गिरी यांनी आपण केलेल्या निस्वार्थी कामाची दखल घेऊन, कौतुक करत, कलाविष्कार प्रतिष्ठानने आपल्या मायभूमीत पुरस्कार देऊन सर्वांसमोर गौरव केला. यामुळे आम्ही भारावल्याचे सांगून, निस्वार्थी, प्रांजळ आणि प्रामाणिक उद्देशाने कलाविष्कार प्रतिष्ठान गौरव करते, हे अकल्पनीय वाटत असले तरी सत्य असल्याचा अभिमान वाटतो असे सांगितले. गौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन संतोष कोठेकर यांनी तर शिवप्रसाद आडाळी यांनी आभार प्रदर्शन केले.
यांच्या कार्याचा झाला गौरव…
श्री संतोष गर्जे (गेवराई भूषण पुरस्कार ), प्रा बापु घोक्षे ( नाट्यरत्न पुरस्कार ), पोउपनि पल्लवी जाधव ( पोलीस रत्न पुरस्कार ), रंजित पवार (समाजरत्न पुरस्कार), अय्युब बागवान (पत्रकार रत्न पुरस्कार), सुनील मुंढे (पत्रकार रत्न पुरस्कार), डॉ अनिल दाभाडे (आरोग्य रत्न पुरस्कार), डॉ अशोक काळे (आरोग्य रत्न पुरस्कार), श्रीमती साविताताई ढाकणे (शिक्षण रत्न पुरस्कार), डॉ राणिताई पवार (क्रीडा रत्न पुरस्कार), महेश बेदरे (कृषी रत्न पुरस्कार), सौ सीताताई महासाहेब ( पर्यावरण रत्न पुरस्कार), राहुल गिरी ( युवा वक्ता पुरस्कार)