भारत

कोर्ट परिसरात गोळ्या घालून हत्या

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Sept :- राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दिल्लीतल्या रोहिणी कोर्ट परिसरात झालेल्या गँगवॉरमध्ये जितेंद्र गोगी नावाच्या गुन्हेगाराची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर हे टिल्लू गँगचे शूटर असून ते वकिलाच्या वेशात आले होते. जितेंद्र गोगीवर गोळी झाडणाऱ्या दोघांचा दिल्ली पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले असल्याची देखील माहिती आहे.

माहितीनुसार दिल्लीतील रोहिणी कोर्टात गॅंगस्टर जितेंद्र गोगीला सुनावणीसाठी आणण्यात आलं होतं. यावेळी वकिलाच्या वेशात आलेल्या शूटर्सनी त्याच्यावर गोळीबार केला. यात त्याचा जागेवर मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरात कारवाई करत शूटर्सचा एन्काऊंटर केला. ही घटना रोहिणी कोर्टाच्या रूम नंबर-207 मध्ये घडली. या शूटआऊट मध्ये चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिस सूत्रांचं म्हणणं आहे की, एन्काऊंटर मध्ये टिल्लू गॅंगच्या दोघांचा खात्मा करण्यात आला आहे. हे दोघे वकिलांचा ड्रेस घालून रोहिणी कोर्टात आले होते. यांनीच जितेंद्र गोगीला गोळी मारली. टिल्लू गॅंगच्या या दोघांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. पोलिसांनी सांगितलं की, गँगस्टर गोगी आणि टिल्लू गॅंगमधील पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली आहे. दरम्यान कोर्टाच्या परिसरात भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली असून पोलिस प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे.जितेंद्र गोगी हा दिल्लीतील टॉप मोस्ट गॅंगस्टर होता.

दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर 4 लाखांचा इनाम ठेवला होता. तर हरिणाया पोलिसांनी देखील गोगीवर अडीच लाखांचा इनाम ठेवला होता. दिल्लीच्या नरेला परिसरात एक स्थानिक नेता वीरेंद्र मान यांच्या हत्याकांडात जितेंद्र गोगी आणि त्याच्या गॅंगचा सहभाग होता. जितेंद्र उर्फ गोगी वर हरियाणाची प्रसिद्ध सिंगर हर्षिता दाहियाच्या हत्येचा देखील आरोप होता. दिल्ली आणि हरियाणा राज्याची पोलिस गँगस्टर गोगीचा शोध घेत होते.