क्राईम

दारू पिऊन झालेल्या वादात सख्ख्या लहान्या भावाचा खून

माजलगाव : दारु पिऊन झालेल्या वादात भावाने लहान भावाचा डोक्यात वार करुन खून केला. माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव (ना) येथे शनिवारी रात्री ही घटना घडली. रविवारी सकाळी हा प्रकार उजेडात आला.

प्राथमिक माहितीनुसार, लक्ष्मण दशरथ काळे (वय २९) असे मृत युवकाचे नाव आहे. तो अविवाहित आहे. त्याला दारुचे व्यसन होते. शनिवारी रात्री दारुच्या नशेत लक्ष्मण व त्याचा मोठा भाऊ गजानन यांच्यात वाद झाला. याच वादात गजानन याने लक्ष्मणच्या डोक्यात कशाने तरी वार केल्याने त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच दिंद्रूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल गव्हाणकर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. मृत युवकाच्या आईनेच पोलिसांना याबाबत खबर दिल्याने पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. दरम्यान, मागील काही दिवसांत सातत्याने जिल्ह्यात खूनाच्या घटना वाढत आहेत.