महाराष्ट्रCovidNewsPopular NewsRecent NewsTrending Newsभारत

“या” तालुक्यातील १२ गावांत पुन्हा कडक लॉकडाऊन

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२२ सप्टेंबर | नगर जिल्ह्यात संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे तेथे आता विशेष लक्ष देण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी पारनेर तालुक्यात भेट दिली. त्यांच्या आदेशानुसार रुग्णसंख्या जास्त असलेल्या बारा गावांत पुन्हा कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. देशात आणि राज्यात करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या दिलासादायक बातम्या येत असताना पारनेरकरांना मात्र पुन्हा लॉकडाउनला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

पारनेर तालुक्यातील भाळवणी, ढवळपुरी, वडनेर बुद्रुक, निघोज, कान्हुर पठार, दैठणे गुंजाळ, वडगाव सावताळ, जामगाव, रांधे, पठारवाडी, कर्जुले हर्या, वासुंदे या प्रमुख गावांत निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तीन ऑक्टोबरपर्यंत या गावांतील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

नगर दौऱ्यावर आलेल्या डॉ. गमे यांनी पारनेरला भेट दिली. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, नायब तहसीलदार गणेश अधारी, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लांडगे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप उपस्थित होते. विभागीय आयुक्त गमे यांनी पारनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासह टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालय व कान्हुर पठार प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य यंत्रणेची पाहणी केली. करोनाच्या संभाव्य तिसरा लाटेच्या पार्श्वभूमीवर पारनेर ग्रामीण रुग्णालयात १०० बेडचे ऑक्सिजन सेंटर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

पारनेर तालुक्यातील अनेक गावात रुग्णांची संख्या वाढत आहे. तेथील समित्यांनी यात लक्ष घालून उपाययोजन कडक कराव्यात, सरकारी अधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. पारनेर व टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात अपुरी कर्मचारी संख्या व आरोग्य सोयी सुविधांचा अभाव असल्याची तक्रार रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ. बाळासाहेब कावरे व शरद झावरे यांनी विभागीय आयुक्त गमे यांच्याकडे केली. या दोन्ही रुग्णालयांत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशीही मागणी करण्यात आली.