News

जिल्ह्यातील १४ जण कोरोनामुक्त

बीड : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या आता कमी होत आहे. माजलगावचे १३ व बीडचा १ असे एकूण १४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना आज (दि.३१) सुटी होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली आहे.
बीडच्या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये या रुग्णावर उपचार करण्यात आले. जिल्हा आरोग्य विभागाकडील नोंदीनुसार, एकूण रुग्ण संख्या ५६ होती. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण २७ असून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २९ इतकी झाली आहे. या २९ पैकी माजलगावच्या १३ व बीडच्या एकास आज सुटी देण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात जोखमीचे ३ रुग्ण आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांचा वाढता आकडा ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात म्हणाले.

आतापर्यंत कोरोनामुक्त झालेले रुग्ण
गेवराई तालुक्यातील इटकूर येथील मायलेकी अशा दोघी, माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील १, कवडगाव थडी येथील २, बीड शहरातील ५, पाटोदा तालुक्यातील वाहली येथील मायलेकी अशा दोघी, आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील १, केज तालुक्यातील केज व चंदनसावरगाव येथील दोघे, असे १५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, आज माजलगाव तालुक्यातील १३ व बीड येथील १ असे एकूण १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आता कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा २९ इतका आहे