आयकर विभागाकडून छगन भुजबळ यांच्याविरोधात तक्रार दाखल
१०० कोटी रुपयांचा बेनामी व्यवहार घोटाळा….
25 Aug मंत्री छगन भुजबळ अडचणीत येण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने मंत्री छगन भुजबळ त्यांचा मुलगा पंकज, पुतण्या समीर आणि त्यांच्या विविध कंपन्यांविरोधात १०० कोटी रुपयांच्या बेनामी व्यवहार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात साखर कारखाना (गिरणा शुगर मिल) १७.८२ कोटी रुपये, पनवेल येथील रोहिंजन गावातील जमीन ६६.९० कोटी रुपये, अंधेरी १७.२४ कोटी रुपये आणि सांताक्रूझ मधील ७.७२ कोटी रुपयांच्या जमिनीचा समावेश आहे.
या जमिनी छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांनी बेनामी कंपन्यांद्वारे केलेल्या गुंतवणुकीचा वापर करून खरेदी केल्याचा आरोप आहे.आयटी अधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबईतील न्यायालयात भुजबळ, समीर, पंकज आणि हे दोघंही संचालक असलेल्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या फर्मविरोधात तक्रार दाखल केली आहे. परवेझ कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आर्मस्ट्राँग एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये ही रक्कम वळवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
त्यानंतर ही रक्कम भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरली होती. कोलकाता, मुंबई आणि इतर ठिकाणाहून एंट्री ऑपरेटरद्वारे पैसे पाठवले गेले आणि नंतर शेअर भांडवलाच्या नावावर त्या कंपन्यांमध्ये पैसे लावले गेले, असं सांगण्यात आलंय.
कोलकातास्थित कंपन्या शेल कंपन्या होत्या आणि त्या दिलेल्या पत्त्यांवरून चालत नव्हत्या. शिवाय त्यांच्या बिझनेस रेकॉर्डमध्ये देखील आयटी अधिकाऱ्यांना अनेक विसंगती आढळल्या आहेत. त्यामुळे पूर्ण तपासानंतर भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांना आयकर विभागाच्या चौकशीला सामोरं जावं लागू शकतं.यापूर्वी महाराष्ट्र सदन प्रकरणात भुजबळांना ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते आणि कित्येक महिने ते तुरुंगात होते.